ओला-उबेरमधील महिला सुरक्षेचे पॅनिक बटण स्वीच ऑफच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हैदराबाद येथील महिलेवर अत्याचार झाल्यानंतर महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर असतानाच ओला-उबेरसह खासगी टॅक्सींमध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी पडणाऱया ‘पॅनिक’ बटणाविषयी अजूनही धोरण निश्चित झाले नसल्याचे सांगण्यात येते. यासंदर्भात कॉल सेंटर तयार करण्यासाठी राज्य परिवहन विभागाने ‘सीडॅक’ संस्थेकडून अहवाल मागविला असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

ओला आणि उबेरसारख्या खासगी टॅक्सींमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी ‘पॅनिक बटण’ बसविण्याचे आदेश परिवहन विभागाने दिले होते. त्यानंतर अनेक खासगी टॅक्सींमध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘पॅनिक बटण’ची सुविधा देण्यात आली. या ‘पॅनिक बटण’मुळे आपत्कालीन परिस्थितीत महिला प्रवाशांना पोलिसांसह कोणतीही मदत मागणे शक्य होणार होते. या कंपन्यांनी सरकारच्या म्हणण्याप्रमाणे ‘पॅनिक बटण’ सुविधा बसविली खरी; परंतु त्यासंदर्भात हेल्पलाइन, कॉलसेंटर तसेच बॅक ऑफिस उभारण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

देशपातळीवरील हेल्पलाइन हवी

महिला टॅक्सी प्रवाशाने जर ‘पॅनिक बटण’ दाबले तर त्याचा कॉल अटेंड करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ आणि बॅक ऑफिस लागेल. शिवाय या टॅक्सींनी राज्याची सीमा ओलांडली तरी त्या राज्यात तो कॉल स्थानिक पोलिसांकडे ट्रान्सफर झाला पाहिजे अशी देशपातळीवरील हेल्पलाइन यंत्रणा तयार करण्यासाठी सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (सी-डॅक) या संस्थेकडून अहवाल मागविण्यात आला असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

अनेक खासगी टॅक्सी चालकांकडे बॅच नाहीत

खासगी टॅक्सींची संख्या परिवहन विभागाने ओला-उबेरसारख्या मोबाईल ऍपवर चालणाऱया खासगी टॅक्सींसाठी शहर टॅक्सी योजना आणली होती. या खासगी टॅक्सींची नोंदणी टुरिस्ट परवाना अंतर्गत झाली असल्याने तसेच त्यांनी शहर टॅक्सी योजनेंतर्गत नोंदणी करण्यास नकार दिल्याने राज्य सरकारचा या खासगी टॅक्सी कंपन्यांवर कोणताही अंकुश राहिलेला नाही. अलिकडेच केलेल्या कारवाईत अनेक टॅक्सी चालकांकडे साधे बॅचदेखील नसल्याचे उघडकीस आले होते. या कंपन्यांनी सरकारच्या म्हणण्याप्रमाणे ‘पॅनिक बटण’ बसवले खरे, परंतु त्यासंदर्भात हेल्पलाइन, कॉल सेंटर तसेच बॅक ऑफिस उभारण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही.