ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा चौथा प्रकार? कसोटी, वन डे, टी-20 नंतर आता टी-10ची एण्ट्री

पॅरिसमध्ये 1900 साली झालेल्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट या खेळाचा समावेश करण्यात आला होता. त्यामध्ये दोनच देश सहभागी झाले होते. या ऑलिम्पिकमध्ये ग्रेट ब्रिटनने सुवर्ण व फ्रान्सने रौप्य पदक जिंकले होते. त्यानंतर मात्र क्रिकेट या खेळाचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. पण बीसीसीआयच्या पुढाकाराने आता ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट या खेळाचा समावेश होऊ शकतो. पण क्रिकेटचा कोणता प्रकार यामध्ये खेळवला जाईल याबाबत निर्णय झालेला नाही. ऑलिम्पिक साधारण 16 ते 18 दिवसांमध्ये आटोपते. त्यामुळे क्रिकेटच्या लहान प्रकाराचा यामध्ये समावेश होऊ शकतो. अबुधाबी येथील टेन-10 क्रिकेटला चाहत्यांचा दणदणीत प्रतिसाद लाभला आहे. बीसीसीआयसह इंग्लंड अॅण्ड वेल्स क्रिकेट बोर्ड यांचाही याला पाठिंबा आहे. आयसीसीही याबाबत विचार करीत आहे. आयसीसीकडून टी-10 ला हिरवा कंदील दाखवण्यात आल्यास कसोटी, वन डे व टी-20 नंतर टी-10 च्या रूपात क्रिकेटचा चौथा प्रकार जगासमोर येणार आहे. यावेळी 2028 किंवा 2032 सालातील ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश झाल्यास आश्चर्य वाटायला नको.

आयसीसीच्या बैठकीत होणार चर्चा

आयसीसीच्या कार्यकारी समितीची बैठक गेल्या आठवडय़ात पार पडली. यामध्ये 2023 ते 2031 या कालावधीतील क्रिकेट दौरे व ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट या विषयांवर चर्चा करण्यात आली. यानंतर बीसीसीआयच्या कार्यकारी समितीने 2028 च्या ऑलिम्पिकमध्ये पुरुष व महिला दोन्ही संघ सहभाग घेतील असे स्पष्ट केले. याच पार्श्वभूमीवर क्रिकेट हा खेळ लवकरच ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट होईल असे संकेत मिळाले आहेत. आयसीसीच्या आगामी बैठकीत पुन्हा एकदा यावर चर्चा होणार असून याबाबत अंतिम निर्णयही घेण्यात येण्याची दाट शक्यता आहे.
टी-20 क्रिकेटवर परिणाम

सध्या जगभरात टी-20 क्रिकेटची धूम दिसून येत आहे. त्यामुळे खरेतर ऑलिम्पिकमध्ये टी-20 क्रिकेटलाच प्राधान्य द्यायला हवे, पण टी-10 या क्रिकेटच्या प्रकारात 90 मिनिटांमध्ये निकाल लागतो. त्यामुळे टी-10 प्रकारावर लक्ष केंद्रित केले जात आहे. शिवाय इंग्लंडमध्ये सुरू झालेल्या हंड्रेड म्हणजेच 100 चेंडूंच्या लढतीचा विचार यावेळी करण्यात येत आहे. प्रत्यक्षात आयसीसी कोणत्या प्रकाराला थम्स अप दाखवते हे आगामी काळातच समजेल. पण वाढत्या प्रकारांमुळे कसोटी, वन डेप्रमाणे टी-20 क्रिकेटवरही परिणाम होऊ शकतो हेही लक्षात घ्यायला हवे.

आपली प्रतिक्रिया द्या