पराभवाचे आत्मपरीक्षण हीच भावी यशाची गुरुकिल्ली!; पुरव राजा, राहुल त्रिपाठी या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सल्ला

कोणत्याही सर्वेत्तम खेळाडूला अपयशातून नेहमीच जावे लागते, या अपयशाचे बारकाईने आत्मपरीक्षण केले तर आपोआपच त्याला भावी यशाची गुरुकिल्ली मिळते, असा सल्ला आंतरराष्ट्रीय टेनिसपटू पुरव राजा व आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू राहुल त्रिपाठी यांनी युवा खेळाडूंना दिला.

डेक्कन जिमखाना क्लबतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ऑलिम्पिक क्रीडा महोत्सवात या दोन्ही खेळाडूंनी आपल्या कारकीर्दीतील विविध यशापयशाचे पैलू उलगडले. तसेच त्यांनी उपस्थित असलेल्या युवा खेळाडूंनाही मार्गदर्शन करताना प्रत्येकाने आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न पाहावे आणि या स्वप्नात आकार देण्यासाठी एकाग्रतेने मेहनत करावी, असाही सल्ला दिला. यावेळी डेक्कन जिमखान्याचे मानद सचिव मिहीर केळकर, क्लबच्या वित्तीय विभागाचे सचिव गिरीश इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते.

‘पराभव कोणालाही टाळता आलेला नाही. अशा पराभवाने निराश न होता आपण कुठे कमी पडलो, याचा बारकाईने अभ्यास केला तर आपोआपच आपल्याला त्याचे उत्तर मिळते. त्यातूनच आपल्याला भावी कारकीर्दीमध्ये सर्वेत्तम यश मिळवण्यासाठी कोणते तंत्र व कौशल्य उपयोगात आणायचे हे शिकायला मिळते’, असे पुरव राजा याने सांगितले. तो पुढे म्हणाला की, समाजमाध्यमांवर आपल्याला सातत्याने टीकेला सामोरे जावे लागते. विराट कोहली, लिएंडर पेस, महेंद्रसिंग धोनी या खेळाडूंनादेखील अशा टीका सहन कराव्या लागल्या आहेत, मात्र त्यांनी निराश न होता सातत्याने अफाट कष्ट करीत जागतिक स्तरावर नावलौकिक मिळविला. हे लक्षात घेतले, तर युवा खेळाडूंनी अशा टीकांकडे दुर्लक्ष करणेच हितकारक असते. त्याचबरोबर अतिकौतुकामुळेही खूप हुरळून जाऊ नये. त्यामुळे कदाचित आपला आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता असते. कितीही कौतुक झाले तरी आपले पाय जमिनीवरच ठेवले पाहिजेत?

राहुल त्रिपाठी याने सांगितले, ‘डेक्कन जिमखाना क्लबमुळेच माझी क्रिकेट कारकीर्द घडली. या मैदानावर मला केदार भावे, हेमंत आठल्ये, केदार जोगळेकर इत्यादी सरांकडून जे मार्गदर्शन मिळाले त्यामुळेच मी आज घडलो. या मार्गदर्शकांनी मला क्रिकेटचे वेगवेगळी कौशल्य आत्मसात करण्याची संधी दिली. काही वेळा एवढे अपयश येते की तुम्हाला कारकीर्दीचा पश्चातापही होत असतो. लागोपाठ तीन वेळा शून्यावर बाद झाल्यामुळे मला महाराष्ट्र संघातून वगळण्यात आले होते, मात्र या अपयशाने मी मनोधैर्य खचू दिले नाही. आपण कुठे कमी पडत आहोत, याबाबत आपल्या प्रशिक्षकांशी निःसंकोचपणे चर्चा करावी. जेणेकरून आपल्याला आपल्या उणिवा दूर करण्यासाठी योग्य उपाय मिळू शकतात, हा माझा अनुभव आहे. युवा खेळाडूंनीही असेच प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.’