ओम चिले दत्त

272

>> विवेक दिगंबर वैद्य

‘शंकर दत्त चिले’ ही सर्वसामान्य व्यक्तित्वाची ओळख पुढे ‘ओम दत्त चिले’ या सद्गुरूतत्त्वात बदलणे ही अद्भुत घटना होती.

सन 1947. आर्थिक विवंचनेत गुरफटलेले बाबुराव अथणे, त्यांचे गुरुबंधू भाऊसाहेब साळगावकर यांच्यासोबत रस्त्याने चाललेले असताना त्यांचे लक्ष, भाऊसाहेबांनी त्यांच्यासमोरून अचानक वेगाने चालत गेलेल्या एका व्यक्तीकडे वेधले. शर्ट-पॅन्ट परिधान केलेली, मध्यम उंचीची, गव्हाळ वर्णाची पंचविसेक वर्षांची सर्वसामान्य भासणारी ती व्यक्ती ‘चिले महाराज’ आहेत असे भाऊसाहेबांनी सांगितल्यावर बाबूरावांना आश्चर्य वाटले. याआधी भाऊसाहेबांनी अनेकदा चिले महाराजांच्या दर्शनास जाण्याचा बाबुरावांना आग्रह केला होता, मात्र काही कारणामुळे बाबूरावांना जाणे जमले नाही. मात्र, या खेपेस ‘श्रीचिले महाराज’ प्रत्यक्ष समोर दिसताहेत म्हटल्यावर ‘आज काही झाले तरी दर्शन घ्यायचेच’ असे म्हणत बाबूरावांनी सायकल काढली आणि वाऱयाच्या वेगाने दूरवर निघून गेलेल्या चिलेदेवांना गाठण्यासाठी त्यांनी सायकल पिटाळली. आपल्या ओढग्रस्त परिस्थितीचे आणि आर्थिक विवंचनेचे गाऱहाणे मांडण्याच्या हेतूने ते चिलेदेवांच्या नजीक पोहोचले तोच चिलेदेव मागे वळले आणि बाबूरावांचा मनोदय ओळखून त्यांच्याकडे नजर रोखून म्हणाले, ‘तुझ्या खिशात पैसा नाही, माझ्याही खिशात पैसा नाही.’ चिलेदेवांनी रिकामे खिसे बाहेर काढून दाखवले आणि बाबूरावांना, ‘चालता हो’ असे म्हणून ते वेगाने निघून गेले.

या घटनेमुळे क्षणभर भांबावलेले बाबूराव पुन्हा चिलेदेवांचा शोध घेत निश्चयपूर्वक गुजरी परिसरातील प्रभात हॉटेलसमोर आले. इथे जे काही घडले, तसेच चिलेदेवांचे जे शब्दसामर्थ्य बाबूराव यांनी अनुभवले, त्याचा प्रभाव पुढील काळात म्हणजेच चिलेदेव समाधिस्थ होईतोवर बाबूराव अथणे यांच्यावर टिकून राहिला. बाबूरावांनी चिलेदेवांची साथ कधीही सोडली नाही. सद्गुरू आणि भक्ताचे हे साहचर्य पुढे, श्रीचिले महाराज समाधिस्थ होईतोवर (म्हणजे, 8 मे 1986 रोजी ते समाधीवस्थेत स्थिर होईतोवर) कायम राहिले, दृढ झाले.

जवळपास चार दशके चाललेला हा गुरुभक्तीचा ऋणानुबंध चिलेदेवांच्या समाधिस्थ होण्यामुळे खंडित झाला तरीदेखील बाबूरावांच्या स्मरणभक्तीत अक्षय्य नांदणारे 275हून अधिक प्रसंग पुढे ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाले आणि चिलेदेवांच्या अतर्क्य, अवधूत अशा सद्गुरूतत्त्वाची अलौकिक जाणीव चिलेभक्तांना अनुभवता आली. बाबूराव अथणे यांना चिलेदेवांचा अखंड सहवास लाभला. अनेकदा चिलेदेव कोल्हापूर तसेच नजीकच्या परिसरात, अगदी पुण्यापर्यंतदेखील येत-जात असत, तेव्हा त्यांच्यासोबत जाण्याचे, त्यांच्या सहवासात राहण्याचे अनेक सुवर्णक्षण बाबूरावांना अनुभवता आले. त्या अलौकिक व दिव्य अनुभवांचे संकलन व लेखन त्यांनी ‘परब्रह्मगुरू चिलेदेव’ ग्रंथात केले आहे.

बाबूराव तवणाप्पा अथणे कोल्हापूर चित्रपटसृष्टीशी संबंधित होते. हातात काम असेल तेव्हा दिवस चांगले जात असत, मात्र बरेचदा हातात काम नसताना किंवा आधीच्या कामाचे पैसे थकलेले असताना बिकट प्रसंग ओढवत असे, मात्र तरीदेखील बाबूराव निरपेक्ष वृत्तीने चिलेदेवांच्या सान्निध्यात असत, चिलेदेवही अनेकदा बाबूरावांच्या घरी वास्तव्य करीत. या अनिश्चिततेच्या काळात चिलेदेवांनीच आपल्याला सांभाळून घेतले ही बाबूरावांची भूमिका अखेरपर्यंत कायम राहिली. पुढे चिलेदेवांच्या सूचनेनुसार त्यांनी कार्यक्षेत्र बदलले. मूळ स्वभावाशी विसंगत अशा कार्यक्षेत्रामध्ये नोकरी केली, मात्र त्यांना कधीही औदासिन्याचा सामना करावा लागला नाही ही केवळ ‘चिलेदेवांचीच कृपा’.

अवधूततत्त्वाची सर्व लक्षणे चिलेदेवांच्या अवतारकार्याचे वैशिष्टय़ प्रकट करण्यास पुरेशी होती. चिलेदेव त्यांच्या भक्तांना लोकविलक्षण कृती करून दाखवीत आणि त्यांच्याकडून करवूनही घेत असत. त्या अतर्क्य कृतीचा प्रत्यय भक्तांकरिता मात्र उपकारक व मांगल्यदायी ठरत असे. सर्वसामान्यांच्या दृष्टीने असंबद्ध भासणाऱया या चिलेदेवांच्या प्रत्येक कृतीमध्ये सुसंगती व सुसंबद्धता होती याचा प्रत्यय पुढे कालांतराने येई तेव्हा, त्या भक्तांवर अथवा प्रत्यक्षदर्शींवर थक्क होण्याची ‘वेळ’ येत असे. एकदा अवर्षणाच्या परिस्थितीमुळे हैराण झालेले कोल्हापूरवासी विलक्षण चिंतेत असता, अचानक चिलेदेवांनी त्यांच्या मुरकुंडे नावाच्या भक्ताला, ‘सिद्धेश्वराच्या पायऱया ‘लक्स’ साबणाने धुऊन काढ, मग पाऊस येईल’ असे सांगितले. मुरकुंडे यांनीही अधिक चर्चा न करता चिलेदेवांच्या सांगण्यानुसार केले. दूरवर कुठेही पावसाचे ढग दिसत नव्हते, मात्र मुरकुंडे यांनी पायऱया धुऊन काढताच अचानक जोराचा पाऊस आला आणि धो धो कोसळला.

अनेकदा चिलेदेव पंचगंगेच्या पात्रातील चिखलगाळाने भरलेली मंदिरे स्वतः धुऊन काढीत तर कधी भक्तांच्या घरी वास्तव्यास असते वेळी त्यांच्या येथील किंवा तिथल्या सार्वजनिक परिसरातील शौचालयेही धुऊन स्वच्छ करीत असत. तहान, भूक आणि विश्रांती यांच्या पलीकडे गेलेले चिलेदेव बरेचदा अनवाणी पायी चालत 25-30 मैलांचे अंतर सहज पार करीत असत. त्यांची अन्नावर वासना नव्हती मात्र कधी कुणाकडे भोजन घेतल्यास ते अगदी नाममात्र आणि साधे असे. साधेपणाने राहणे हे त्यांच्या जगण्या-वागण्याचे सूत्र होते.

चिलेदेवांच्या वरकरणी असंबद्ध वागण्याबोलण्यात गहन अर्थ दडलेला असे. ‘वशिला नाही…माल चोख, पैसा रोख’, ‘नाटक करावे पण त्यात पाप नसावे’, ‘माझ्याकडे पाचशे नोकर आहेत, पण माझ्या दर्शनाला येतात फक्त शे-दीडशे माणसे!!’ ही त्यांची संभाषणातील नेहमीची वाक्ये असत. बाबूराव अथणे हे खऱया अर्थाने भाग्यवंत म्हणावे लागतील कारण त्यांना चिलेदेवांचा प्रेमळ सहवास तर लाभलाच, त्यासोबत त्यांना चिलेदेवांमधील अतिविलक्षण अनुभवांचा सहज प्रत्ययही प्राप्त झाला. साक्षात हनुमंत आणि विष्णूदेवाचे दर्शन घडणे हे त्या विलक्षण अनुभवांमधील दोन महत्त्वपूर्ण प्रसंग होते. बाबूराव अथणे यांच्यासोबतच मुजावर, फडकेताई, मानेमामा, लळीत, जांभळीकर, राबाडे पैलवान, डॉ. निर्गुणराव पवार या आणि अशा अनेक भक्तांना चिलेदेवांनी ‘अनुभव’समृद्ध केले.

‘हजारो वर्षांपूर्वीचा ऋषीमुनी तो मीच’ अशी स्पष्ट ग्वाही देणाऱया चिलेदेवांनी ‘माझ्या दर्शनानेच पाप जळून जाईल’ असे सुस्पष्ट आश्वासनही दिले आहे. ‘हीन स्वार्थ न बाळगता माझ्याकडे आत्मकल्याणाची इच्छा धरून यावे’ अशी सूचनाही चिलेदेव करतात. ‘जे जे घडते ते माझ्या इच्छेनेच’ असे स्पष्ट प्रतिपादन करताना ‘श्रद्धा वाढवा मग बुद्धीभ्रंश होणे थांबेल’ अशी कानउघाडणीही चिलेदेव करतात. चिलेदेवांच्या मुखातून उमटलेली ही ‘देववाणी’ बाबूराव अथणे यांच्या ‘परब्रह्मगुरू चिलेदेव’ या ग्रंथातील 275 लीला प्रसंगांमधून शब्दबद्ध झालेली आहे. श्रीचिले महाराजांविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असलेल्यांनी ‘परब्रह्मगुरु चिलेदेव’ हा ग्रंथ वाचला पाहिजे. परमेश्वर अन् त्याच्या निस्सीम भक्तामधील हळुवार नाते नेमके कसे असते याची महती कथन करणारा असा हा ग्रंथ आहे. (मध्यंतर)

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या