हिमालयातील अमरनाथ येथील गुहांमध्ये बर्फापासून नैसर्गिकरित्या शिवलिंग निर्माण होते. त्याचप्रमाणे उत्तराखंडमधील पिथौरागड जिह्यात ओम् पर्वत येथे दरवर्षी ओम् अशी आकृती तयार होते. मात्र या ओम् पर्वतावर नैसर्गिकरीत्या तयार होणारी ओम् ही प्रतिकृती यावेळी तयार झाली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इतिहासात हे पहिल्यांदाच घडले आहे.
ओम् पर्वत हा चीनच्या सीमेला लागून असलेल्या लिपुलेख दरीजवळ आहे. तसेच ओम् अशी आकृती तयार होत असल्याने हा पर्वत ओम् पर्वत या नावाने प्रसिद्ध झाला आहे. ही आकृती न बनण्यामागे ग्लोबल वार्मिंग हे एक कारण असू शकते, अशी शक्यता तज्ञांनी वर्तवली. त्याचबरोबर पर्यटन वाढल्याने येथे रस्ते बांधले जात आहेत. त्यामुळे हिमालयातील पर्यावरण आणि हवामानावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. ओम् पर्वत पिथौरागड जिह्यापासून 170 किमी दूर अंतरावरील नाभीढांग येथे स्थित आहे. येथील निसर्गाचा चमत्कार भल्याभल्यांना बुचकळ्यात पाडतो.
दरवर्षी येथे बर्फामुळे ओम ही आकृती कशी काय तयार होते, असा प्रश्न पडतो. हे स्थान शिवशक्तीच्या आशीर्वादाची साक्ष आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. ओम् पर्वताच्या धार्मिक आणि पौराणिक महत्त्वाचा उल्लेख महाभारत, रामायण आणि काही पुराणांमध्येही सापडतो.