
जम्मू-कश्मीरमध्ये 13 जुलै रोजी शहीद दिन साजरा करण्यावर केंद्र सरकारने बंदी घातल्याने मोठा वाद पेटला. हा बंदी आदेश झुगारून मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला थेट शहीद स्मारकावर पोहोचले. स्मारकावर जाण्यास अडवणाऱ्या पोलिसांशी त्यांची झटापट झाली. स्मारकाच्या बाहेरही ते पोलिसांना नडले आणि थेट गेटवर चढले. स्मारकावर जाऊन त्यांनी श्रद्धांजली वाहिली.
डोगरा राजवटीविरोधात लढताना मृत्युमुखी पडलेल्या 22 कश्मिरींना श्रद्धांजली वाहण्यासाठी जम्मू-कश्मीरात 13 जुलै हा शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो. 370 कलम हटवल्यानंतर यावर बंदी होती. शासकीय सुट्टीही रद्द करण्यात आली. राज्यात नवीन सरकार आल्यानंतर प्रमुख राजकीय पक्षांनी शहीद दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्याला भाजप नेत्यांनी कडाडून विरोध केला होता.
घराबाहेर बंकर उभारला
केंद्र सरकारच्या आदेशावरून आम्हाला नजरकैदेत ठेवण्यात आले. आम्हाला शहीदांच्या स्मारकात जाण्याची परवानगी नव्हती. मी नियंत्रण कक्षाला कळवले की मला तिथे जाऊन फातेहा वाचायचा आहे. पण, काही मिनिटांतच माझ्या घराबाहेर एक बंकर उभारण्यात आला, असा आरोप ओमर अब्दुल्ला यांनी केला.
भाजपने आमच्याकडून अपेक्षा ठेवू नयेत
भाजपाला असे वाटत असेल की सरकारचे खच्चीकरण करून कश्मीर खोऱ्यात त्यांना फायदा मिळेल. तर ते चुकीचे आहेत, त्यांनी आमच्याकडून फार अपेक्षा ठेवू नये, आम्ही कुणाचेही गुलाम नाही, वाटेल तेव्हा आम्ही शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी येणार, असा इशारा ओमर अब्दुल्ला यांनी दिला.