मी शिवभक्त विषही पचवतो, मोदींना नवा साक्षात्कार

‘‘मी बायोलॉजिकल नाही, मला देवानं पाठवलंय,’’ असे म्हणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज आणखी एक साक्षात्कार झाला. ‘‘मी भगवान शंकराचा भक्त आहे, विषही पचवतो,’’ असे मोदी म्हणाले.

आसाम दौऱ्यावर असलेल्या मोदींनी आज एका सभेला संबोधित केले. त्या वेळी त्यांनी पुन्हा एकदा आईच्या कथित अपमानाचा मुद्दा उपस्थित केला. ‘‘मला कितीही शिव्या दिल्या तरी फरक पडत नाही. मी शिवभक्त आहे, सगळे विष प्राशन करू शकतो. पण जेव्हा दुसऱ्या कोणाचा अपमान होतो, तेव्हा मला ते सहन होत नाही,’’ असे मोदी म्हणाले.

प्रख्यात गायक भूपेन हजारिका यांच्या कथित अपमानाबद्दल ते बोलत होते. आमच्या सरकारने भूपेनदांना ‘भारतरत्न’ दिला तेव्हा काँग्रेसने त्यावर टीका केली होती. नाचणा-गाणाऱयांना सरकार भारतरत्न देते, असे काँग्रेस पक्ष म्हणाला होता. त्यामुळे मला खूप दुःख झाले होते, असे मोदी म्हणाले.