
गुजरातमधील राजकारणात अभूतपूर्व आणि चकित करणारी घटना समोर आली आहे. भरतसिंह वाखला या उमेदवाराने एकाच जागेसाठी तीन वेगवेगळ्या पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दाहोद जिल्हा पंचायतमधील पिपेरो या जागेसाठी वाखला यांनी भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष या तिन्ही प्रमुख पक्षांच्या उमेदवार म्हणून अर्ज दाखल केले आहेत.
पिपेरो मतदारसंघ हा परंपरेने बचुभाई खबड यांचा बालेकिल्ला मानला जातो. वाखला यांनी मागील विधानसभा निवडणुकीत आप कडून निवडणूक लढवत भाजपला जोरदार टक्कर दिली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी पक्षांतर करत आधी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, नंतर आपमध्ये घरवापसी केली. आणि आता ते अलीकडे भाजपकडे झुकल्याचे दिसून आले.
या निवडणुकीत एकूण 11 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून त्यातही एक विचित्र समीकरण दिसून आले आहे. भाजपकडून 5 अर्ज (त्यात वाखला यांचा समावेश), काँग्रेसकडून 2 अर्ज (त्यात वाखला), AAP कडून 1 अर्ज (वाखला), तसेच 2 अपक्ष आणि 1 BRP पक्षाचा उमेदवार असे चित्र आहे.
यामुळे प्रथमच असे घडले आहे की, तिन्ही प्रमुख पक्षांच्या कागदोपत्री उमेदवार म्हणून एकाच व्यक्तीचे नाव समोर आले आहे.
तथापि, वाखला यांच्या उमेदवारीची कायदेशीर वैधता संबंधित पक्षाच्या अधिकृत मान्यतेवर अवलंबून आहे. निवडणूक नियमांनुसार, कोणत्याही उमेदवाराला पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मान्यता मिळण्यासाठी संबंधित पक्षाने ‘Form B’ (अधिकृत पत्र) अंतिम मुदतीपूर्वी सादर करणे आवश्यक असते.
स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले की, 15 तारखेला अर्ज मागे घेण्याची आणि अधिकृत मान्यता सादर करण्याची अंतिम मुदत आहे. त्या दिवशीच स्पष्ट होईल की वाखला कोणत्या पक्षाचे अधिकृत उमेदवार राहणार.
























































