अजून एक आयर्न मॅन!!!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बाबासाहेब गायकवाड,[email protected]

अतिशय अवघड आणि खडतर अशी फ्रान्समधील ‘आयर्न मॅन’ ही स्पर्धा या वर्षी हिंदुस्थानी आयपीएस अधिकारी, नाशिकचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी जिंकली आहे. 42 किलोमीटर धावणे, 180 किलोमीटर सायकलिंग आणि 3.86 किलोमीटर पोहणे हे अंतर त्यांनी अवघ्या 15 तास 13 मिनिटे 21 सेकंदांत पूर्ण केले. आयर्न मॅनचा किताब मिळवून त्यांनी नाशिकसह हिंदुस्थानच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. फ्रान्समधील आयर्न मॅन स्पर्धेचे शिवधनुष्य त्यांनी कसे पेलले, याविषयी…

पोलिसांना काय सांगाल?

पोलिसांना कधी कधी बारा-बारा, वीस-वीस तास उभे राहावे लागते. कामाचा ताण असतो. तणावमुक्त आदर्श पोलीस होण्यासाठी पोलिसांनी शरीराकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे. व्यायामावर भर द्यावा. वेगवेगळ्या व आव्हानात्मक स्पर्धांमध्ये भाग घ्यावा.

आयर्न मॅन व्हावे असे का वाटले?

काहीतरी आव्हानात्मक करण्याचे माझे ध्येय आहे. आयर्न मॅन स्पर्धा ही आव्हानात्मक असल्याने मी ती पूर्ण करण्याचे ठरविले. पोलीस आयुक्त म्हणून कायदा-सुव्यवस्था राखण्याचे कर्तव्य मी करतोच; परंतु ही स्पर्धा त्यापेक्षा वेगळी आणि माझ्या कामासाठी उपयोगी आहे. तिच्यामुळे शारीरिक व मानसिक क्षमता वाढते त्यामुळे आपण अधिक चांगले काम करू शकतो, असे मला वाटते. यापूर्वी मी 38 तास पुणे ते गोवा सायकलिंग केले होते. मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. नेमबाजी, क्रिकेटचाही मला छंद आहे.

या खडतर शर्यतीची पूर्वतयारी कशी केली?

सायकलिंग आणि रनिंग मी करायचोच त्याची वेळ वाढवली. पोहण्याचा मला फारसा अनुभव नव्हता. स्पर्धेसाठी नाव नोंदविल्यावर पोहण्याचा सराव वाढविला. फ्रान्समधील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी मी पहाटे साडेतीनपासूनच सरावाला सुरुवात करायचो. रनिंग, सायकलिंग, पोहणे याचे वेळापत्रकच ठरविले होते. नाशिकमधील मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतल्यानंतर माझ्या पायाला फोड आले होते, त्यावर शस्त्रक्रिया करून नंतर लगेचच सरावाला सुरुवात केली.

शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी काय केले?

नाशिकचे वातावरण हे व्यायामाकरिता क्रीडापटूंसाठी खूपच चांगले आहे त्याचा मला खूपच फायदा झाला. पहाटे उठून धावण्याची क्षमता वाढवली. सायकलिंगचेही तसेच केले. पोहण्यासाठी तरण तलावांसह अंबोली, बेजे आणि वालदेवी या धरणांमध्ये भल्या पहाटे सराव केला.

नोकरी आणि स्पर्धेचा सराव याचा ताळमेळ कसा साधला?

नोकरीतील कर्तव्याला मी नेहमीच प्राधान्य देतो त्यात कधीही तडजोड करीत नाही, कधीही केली नाही, यापुढेही करणार नाही. स्पर्धेचा सराव हा जास्तीत जास्त सुट्टीच्या दिवशी केला. त्या दिवशी काही महत्त्वाचे असेल तर त्या कामालाच मी प्राधान्य दिले. सरावाच्या काळात मी कधीही कार्यालयात उशिरा आलो नाही. सकाळी सवादहा वाजता मी हजर असायचो. मी या स्पर्धेसाठी सराव करतोय, भाग घेतलाय याचा गवगवा कधी केला नाही. फ्रान्सला जाण्याच्या थोडे दिवस आधी हे सर्वांना माहीत झाले होते.

आहारावर कसे लक्ष केंद्रित केले?

कोणत्या कॅलरीज किती प्रमाणात आवश्यक आहेत हे निश्चित केले. तुम्ही काय खातात, कसे आणि केव्हा खातात याला फार महत्त्व आहे, त्याप्रमाणेच नियोजन केले. प्रथिने आणि कर्बोदके यांचे संतुलन साधले. दुग्धजन्य पदार्थ मी घेतच नाही. जेवणाची वेळ सायंकाळी साडेसातची निश्चित केली. सकाळी व्यायामाआधी व नंतर काय खायचे, दुपारचे जेवण या सर्व वेळा, प्रमाण व आहारात काय हवे हे काटेकोरपणे पाळले.

या वयात आव्हानात्मक स्पर्धा जिंकली?

 जिद्द, आत्मविश्वास आणि आवड यामुळे माझ्या सरावावर वयाचा परिणाम झाला नाही. आपण पन्नाशीचे झालो म्हणजे म्हातारे झालो ही मानसिकता बदलायला हवी. निर्व्यसनी राहून शरीराला व्यायामाच्या व्यवस्थित सवयी लावल्या, तर माणूस नेहमी तंदुरुस्त व उत्साही राहतो यावर माझा विश्वास आहे. मी 51 वर्षांचा असूनही आत्मविश्वासाच्या जोरावर ही स्पर्धा जिंकली.

कुटुंबाची साथ कशी मिळाली?

माझ्या कुटुंबात व्यायामाची व खेळाची सर्वांनाच आवड आहे. पत्नीचे नेहमीच प्रोत्साहन असते. माझी 18 वर्षांची मुलगी रविजा हीसुद्धा माझ्याबरोबर फ्रान्समध्ये या स्पर्धेत उतरली होती. अवघी पाच मिनिटे कमी पडल्याने ती ही स्पर्धा जिंकू शकली नाही. ती जिद्दी असल्याने भविष्यात ही स्पर्धा ती जिंकेलच, असा विश्वास आहे. तिनेही माझ्यासारखाच सराव केला होता. स्विमिंगमध्ये राष्ट्रीय पातळीवर तिने यश संपादन केले आहे. मुलगा रेवांत हा उत्कृष्ट टेनिसपटू आहे. नॅशनल, इंटरनॅशनलमध्ये तो खेळला आहे.

नाशिककरांना काय सांगाल?

 मुळात नाशिकचे वातावरण खेळासाठी चांगले आहे. येथील नागरिकही सकारात्मक आहेत. मॅरेथॉनसह विविध स्पर्धा येथे होतातच. शरीराची चांगली काळजी घेऊन नाशिककरांनी हे शहर एक आदर्श हेल्थ सिटी म्हणून नावारूपाला आणावे, असे वाटते.