एक देश, एक निवडणूक काळाची गरज; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले निवडणूक व्यवस्थेत बदलाचे संकेत

एक देश, एक निवडणूक ही काळाची गरज असून यावर मंथन होण्याची गरज असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक व्यवस्थेत बदलाचे संकेत दिले. बदलत्या काळानुसार आता व्यवस्था पेपरलेस करण्यावर भर दिला पाहिजे, असेही ते म्हणाले.

ऑल इंडिया प्रिसायडिंग ऑफिसर्सची गुजरातच्या केवडिया येथे परिषद होत आहे. या परिषदेत सहभागी झालेल्या अधिकाऱयांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ काॅन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. एक देश एक निवडणूक ही संकल्पना आता काळाची गरज बनली आहे. या कल्पनेवर विचारमंथन झाले पाहिजे. पीठासीन अधिकारी यासंदर्भात विशेष मार्गदर्शन करू शकतात, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

नव्या धोरणानुसार दहशतवादाचा मुकाबला

भाषणाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26/11च्या हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. मुंबई हल्ल्याची घटना हिंदुस्थान कधीही विसरू शकणार नाही असे सांगून त्यांनी नवा देश आता नव्या धोरणानुसार दहशतवादाचा मुकाबला करत असल्याचे स्पष्ट केले. दहशतवादाला खणखणीत उत्तर देणाऱया सुरक्षा यंत्रणांनाही त्यांनी नमन केले.

आपली प्रतिक्रिया द्या