
पदपथावर झोपण्यास विरोध केल्याने फिरस्त्याने एकाचा पाठलाग करून हत्याराने त्याच्यावर वार केल्याचा धक्कादायक प्रकार ससून रुग्णालयाच्या गेटसमोर घडला आहे. यात एकजण गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अज्या उर्फ अजय महादेव राऊत (वय 53) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर या हल्ल्यात राजूसिंग ठाकूर (वय 48) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजुसिंग यांनी अज्या उर्फ अजयला इराणी मार्केटच्या फुटपाथवर झोपण्यास विरोध केला होता. रागातून त्याने राजूसिंगचा पाठलाग करून त्यांच्यावर वार केला आहे. राजूसिंग हाताचे टाके काढण्यासाठी ससून रुग्णालयात आले होते. त्यावेळी ते गेटसमोरील रिक्षा स्टॅण्डजवळ आल्यानंतर अचानक पाठीमागे आलेल्या अज्या उर्फ अजय याने त्यांच्यावर हत्याराने सपासप वार करण्यास सुरुवात केली. बुधवारी भरदुपारी हा प्रकार घडल्याने गोंधळ उडाला होता. बंडगार्डन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली.































































