दिपक गद्रे यांच्याकडे मागितली 20 लाखाची खंडणी,एकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bribe-taking
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी। रत्नागिरी

रत्नागिरीतील गद्रे मरीन प्रा.लि. चे मालक आणि उद्योजक दीपक पांडुरंग गद्रे यांना एका तोतया पोलीस निरीक्षकाने फोन करून तुमच्यासाठी परदेशी बनावटीचे पिस्तुल घेऊन येणाऱ्या व्यक्तीला पकडले असून तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे अटक टाळण्यासाठी तुम्ही २० लाख रुपये द्या अशी खंडणी मागितली होती. दरम्यान पोलिसांनी सापळा रचून एका संशयिताला अटक केले असून तोतया पोलीस निरीक्षक फरार आहे.

दीपक गद्रे यांना एक निनावी फोन आला होता. समोरील व्यक्तीने पालघर घोळवड पोलीस ठाणे येथून पोलीस निरीक्षक पाटील बोलतोय असे सांगून गद्रे यांच्याकडे वीस लाख रुपयांची मागणी केली. ही गोष्ट दिपक गद्रे यांनी पोलिसांना सांगितली. त्यानंतर पुन्हा फोन आल्यानंतर दिपक गद्रे यांनी पैसे द्यायचे कबुल केले. दहा लाखाचा पहिला हफ्ता देण्याचे ठरले. त्यानंतर ठाणे येथे पोलिसांनी सापळा रचला. मात्र ठरलेल्या ठिकाणात चार-पाच वेळा बदल करत अखेर एका ठिकाणी चौकात पैसे घ्यायचे ठरले. त्यानंतर तोतया पोलीस निरीक्षकाने चारचाकी गाडीतून खाली न उतरतां एका इसमाला पैसे घेण्यासाठी पाठवले. पोलिसांनी पैसे घेण्यासाठी आलेल्या नरसिंग कारभारी (25) याला पकडताच तोतया पोलीस निरीक्षकाने पळ काढला.पोलिसांनी नरसिंग कारभारी याची कसून चौकशी केली तो मुंबई पोलीसांचा खबऱ्या म्हणून काम करत असल्याचे निदर्शनास आले.