
दिवाळी पाडव्याच्या गडबडीची संधी साधत गोमांसाची तस्करी करताना संगमनेर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 1 टन गोमांसासह 9 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संगमनेर तालुक्यातील समनापूर शिवारात गोवंश मांस घेऊन मुंबईकडे जाणारा हा टेम्पो पोलिसांनी पाडव्याच्या पहाटे पकडला.
शाबान अली हुकूम अली शहा (वय 38, रा. गोवंडी, मुंबई) आणि तोहिद दोस्त मोहम्मद पठाण (वय 30, रा. आळे, ता. जुन्नर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलीस कर्मचारी एकनाथ खाडे यांनी फिर्याद दिली आहे.
दीपावली पाडव्याच्या दिवशी पहाटे 2 वाजेच्या सुमारास एका टेम्पोमधून गोमांसाची वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर शहर पोलिसांच्या पथकाने शहरालगतच्या समनापूर बायपासवर सापळा लावला. या सापळ्यात संशयास्पद टेम्पो अडकल्यानंतर त्याची तपासणी केली असता, त्यात सुमारे 1 हजार किलो गोमांस असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी टेम्पो आणि गोमांस ताब्यात घेतले असून, याप्रकरणी दोघा जणांवर कारवाई केली आहे. हे गोमांस मुंबईला नेले जात होते. हे गोमांस संगमनेर तालुक्यातील कुरण किंवा श्रीरामपूर तालुक्यातील हसनापूर येथून आणले असावे, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
मशिदीत गोमांस विकणाऱया मौलानासह दोघांना अटक
पुणतांबा येथे नुरानी मशिदीमध्ये विक्रीसाठी आणलेले गोमांस ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणतांबा येथील नुरनी मस्जिद भागात बऱयाच दिवसांपासून गोमांस विक्री होत असल्याची माहिती परिसरातील नागरिकांना समजली होती. त्या अनुषंगाने गुरुवारी (दि. 27) दुपारी नुरानी मशिदीचे मौलाना व मांस विक्रेत्याला गावकऱयांनी मुद्देमालासह पकडले व मुसा आजम शेख (वय 69, रा. कोपरगाव) आणि आकील शेख यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्याकडील गोमांस हस्तगत केले असून, सुनील तरटे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.




























































