कांदा व्यापाऱ्याची 81 लाखांची फसवणूक

अहिल्यानगर बाजार समितीच्या नेप्ती मार्केटमधील कांदा व्यापाऱयाची आंध्र प्रदेशातील व्यापाऱयाने कांदा खरेदी करून त्याचे पैसे न देता 81 लाख 67 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत कांदा व्यापारी विकास किशोर वाघ (वय 35, रा. वाघ गल्ली, नालेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे नेप्ती मार्केटमध्ये कांदा व्यापारी आहेत. त्यांची आंध्र प्रदेश येथील परमात्मा मारीशेट्टी या व्यापाऱयाशी ओळख झाली होती. अनेक दिवस त्यांच्यात कांदा खरेदी-विक्रीचा व्यवहार झाल्याने मारीशेट्टी याने फिर्यादी वाघ यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर नोव्हेंबर 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत मारीशेट्टी याने मोठय़ा प्रमाणात कांद्यांची मागणी केली. त्याच्या मागणीप्रमाणे वाघ यांनी या कालावधीत जवळपास 2 कोटी 29 लाख 68 हजार 251 रुपये किंमतीचा कांदा मालट्रकने आंध्र प्रदेशात मारीशेट्टी याच्याकडे पाठविला होता. त्यापैकी त्याने 1 कोटी 48 लाख वाघ यांच्या बँकेच्या खात्यावर पाठविले. उर्वरित 81 लाख 67हजार 240 रुपये दिले नाही.

उर्वरित पैशाबाबत वेळोवेळी मागणी केली असता त्याने आज देतो, उद्या देतो, असे सांगून वेळकाढूपणा केला. त्यानंतर पुन्हा तीन महिन्यांनी त्या पैशांची मागणी केली असता, तो उडवाउडवीची उत्तरे देवून टाळाटाळ करू लागला, त्यानंतर आजपर्यंत त्याने ते पैसे दिले नाहीत. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर वाघ यांनी 12 डिसेंबर रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.