
कांद्याच्या किमतीने आधी ग्राहकांना रडवले, नंतर शेतकऱ्यांना …आणि आता कांदा सरकारला रडवण्याचे काम करीत आहे. कांद्याचे नवे उत्पादन आल्यामुळे कांद्याच्या किमती घसरल्या आहेत. त्यातच केंद्र सरकारने तुर्कीवरून मागवलेला कांदा तसाच पडून आहे. तो कांदा सडण्याच्या अवस्थेत आहे. त्यामुळे अवघ्या प्रति किलो 10 रुपये दराने राज्यांना कांदा विकण्याची नामुष्की केंद्र सरकारवर आली आहे.
केंद्र सरकार नाफेड आणि एमएमटीसी या यंत्रणांच्या माध्यमातून कांदा राज्यांना विकत आहे. बाजारात कांद्याचे नवे उत्पादन आल्यामुळे महाराष्ट्रातील नाशिक जिह्यातील लासलगाव बाजारात अवघ्या 1,780 रुपये प्रति क्विंटल दरापर्यंत कांद्याची विक्री होताना दिसत आहे.
ग्राहक विदेशी कांद्यापेक्षा देशी कांद्याला पसंती देताना दिसत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने परदेशातून आणलेल्या कांद्याला खरेदीदार मिळताना दिसत नाहीत. तुर्कस्तानचा आयात कांदा जेएनपीटी बंदरात मोठय़ा प्रमाणात पडून आहे. हा कांदा सडण्याची भीती आहे. तो विकताना सरकारला घाम फुटत आहे. शेतकरीदेखील कांद्याला चांगला भाव मिळत नसल्याने हैराण आहे.
























































