महाडमध्ये चोरट्याने मारला कांद्यावर डल्ला

433

सोने, पैसे, चीजवस्तू, ऐवज चोरून नेल्याचे आपण नेहमी ऐकत असतो. मात्र महाड मध्ये चक्क सध्या सोन्याचा भाव आलेल्या कांद्याच्या दोन पोती अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्याने बटाटा व लसूण याच्या गोणी असताना फक्त कांद्याच्याच पोती नेल्या आहेत. त्यामुळे कांदा विक्रेत्यांना कांद्यासाठी आता सुरक्षा रक्षक नेमण्याची गरज निर्माण झाली आहे.

देशात सध्या कांदा हा सर्व सामान्यांसह श्रीमंतांनाही रडवत आहे. कांद्याचा भाव हा गगनाला भिडला आहे. त्यामुळे सर्व सामान्यांच्या खिशाला चाट बसला आहे. घाऊक बाजारात कांद्याचा भाव 40 ते 45 रुपायांपर्यंत पोहचले असुन किरकोळ बाजारात 70 ते 80 रुपये किलो विकला जात असताना महाड मधील करकोळ कांदा विकणाऱ्या व्यापाऱ्यांची दोन कांद्याची पोती अज्ञात चोरट्याने चोरून दिवाळी साजरी केली आहे.

महाड शहरातील लोखंडी पूल येथे किरकोळ कांदा, बटाटे लसूण विकणाऱ्या जयेश शिरशिवकर उन्हा, पावसाची पर्वा न करता कांदा, लसूण, बटाटे विक्री व्यवसाय करतो. दिवसभर धंदा करून झाला की राहिलेला माल आपल्या छोट्याशा गाळ्यात ठेवतो. गाळा बंद करून जयेश रात्री घरी गेला. रात्री अज्ञात चोरट्याने जयेश याचा गाळा फोडून गाळ्यातील फक्त कांद्याची दोन पोती चोरून नेली. हा प्रकार दुसऱ्या दिवशी जयेश दुकानात आल्यानंतर उघडकीस आला.

अज्ञात चोरट्याने साधारण पंधरा हजाराचा माल चोरून नेल्याचे समजत आहे. देशात सध्या कांदा महागला असल्याने चोरट्यानी आपला मोर्चा आता कांदा चोरीकडे वळवल्याचे दिसत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या