
मुंबई विभागातील ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत ऑफलाईन म्हणजे महाविद्यालयांच्या स्तरावर होणारे अकरावीचे प्रवेश यंदा म्हणजे 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत.
आतापर्यंत ऑनलाईन प्रवेश मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या कक्षेतील केवळ मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) येणाऱया भागातच होत होते. उर्वरित ग्रामीण भागात महाविद्यालयांच्या स्तरावर प्रवेश केले जात होते. परंतु, या वर्षापासून संपूर्ण राज्यातील अकरावीचे प्रवेश पेंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे मुंबई विभागातील एमएमआर क्षेत्राबाहेरील ग्रामीण भागातील कॉलेजांचे प्रवेशही आता ऑनलाईन कक्षेत येणार आहेत.
ठाणे, रायगड, पालघर या सर्व जिह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेकरिता नोंदणी करण्याचे आदेश मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिले आहेत. कॉलेजांना https://forms.gle/E2K5a5wwssuwQ9Pt6 या लिंकवर ही नोंदणी करता येईल. शाळांनीही आपल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना याची माहिती देण्याची सूचना करण्यात आली आहे.
जी महाविद्यालये माहिती भरणार नाहीत, त्यांना अकरावी प्रवेशाकरिता विद्यार्थी अलॉट केले जाणार नाहीत. या प्रवेश प्रक्रियेविषयी मार्गदर्शन करण्यासाठी उपसंचालक कार्यालयात स्वतंत्र प्रवेश नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या ठिकाणी विद्यार्थी-पालकांनाही मार्गदर्शन केले जाईल, अशी माहिती मुंबई शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी दिली.