पेटीएम, गुगल पेच्या माध्यमातून ऑनलाइन फसवाफसवी, जामताराच्या दोघा आरोपींना अटक

फोन पे कार्यालयातून बोलतोय, फोन पेकडून कॅश बॅक ऑफर आहे अशी बतावणी करून नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करणाऱया जामतारा येथील दोघा भामटय़ांना अॅण्टॉप हिल पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत.

अॅण्टॉप हिल येथील मोतीलाल नगरात राहणारा आकाश (24) याला अज्ञात मोबाईल क्रमांकावरून फोन आला. समोरच्याने तो फोन पेच्या कार्यालयातून बोलत असल्याचे सांगितले. मग त्यांना फोन पेकडून कॅश बॅक ऑफर आहे असे भासवून आरोपींनी आकाशच्या बँक खात्यातील हजार रुपये दुसऱया बँक खात्यात वळते करून घेतले. आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आकाशने अॅण्टॉप हिल पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून वरिष्ठ निरीक्षक मनोज हेगिष्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि चेतन मसुटगे, उपनिरीक्षक राहुल वाघ तसेच चौधरी, शिंदे, पुंभार, पाटील, पोटे व पथकाने तत्काळ तपास सुरू केला. आकाशच्या पेटीएम बँक खात्यात्यावरून कोणत्या बँक खात्यात पैसे वर्ग झाले याची  माहिती सायबर सेफ पोर्टलवरून मिळवली. मग तांत्रिक माहितीच्या आधारे पंचशील नगर येथून  जैनुल अन्सारी, भरत मंडल यांना पकडले.