भामट्याने पानवाल्याला लावला ऑनलाइन चुना, जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चेकबुक अपडेट करण्याच्या नावाखाली सायबर भामट्याने पानवाल्याला चुना लावल्याची घटना घडली आहे. फसवणूकप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

तक्रारदार हे जुहू परिसरात राहत असून त्याचे पान बिडी शॉप आहे. गेल्या महिन्यात त्यांना मोबाईलवर फोन आला. भामट्याने आपण एका सरकारी बँकेतून बोलतोय असे भासवले. बँकेचे पासबुक आणि डेबिट कार्ड अपडेट होत असल्याची बतावणी केली. अपडेटच्या नावाखाली भामट्याने तक्रारदाराच्या पासबुकच्या पहिल्या पानाचा फोटो मागितला. त्यानंतर डेबिट कार्डचा 16 अंकी नंबर आणि सीव्हीसी नंबर घेतला. नंबर दिल्यावर तक्रारदारांना मोबाईलवर एक ओटीपी आला. तो ओटीपी त्यांनी शेअर केल्यावर त्याच्या बँक खात्यातून सुरुवातीला 35 हजार रुपये गेले. पैसे गेल्याबाबत त्यांनी भामट्याला विचारणा केली तेव्हा उद्या खात्यात पैसे जमा होईल अशा भूलथापा मारल्या.

दुसर्‍या दिवशी पुन्हा भामट्याने तक्रारदारांना मोबाईलवर फोन केला व डेबिट कार्डची माहिती आणि ओटीपी घेऊन बँक खात्यातून पैसे काढले. पैसे गेल्याने त्यांनी विचारणा केली. तेव्हा सर्व पैसे उद्या खात्यात जमा होईल असे भामट्याने तक्रारदारांना सांगितले. भामट्याने तक्रारदाराच्या खात्यातून 2 लाख 44 हजार रुपये काढले. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली. तेव्हा बँकेच्या वतीने कोणीच फोन केला नसल्याचे तक्रारदारांना सांगण्यात आले. फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी जुहू पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी फसवणूक आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.