
सामना प्रतिनिधी । मुंबई
घटस्थापनेला अवघे काही दिवस उरलेले असताना आता नवरात्रोत्सव मंडळांना मंडपांसाठीही या वर्षीपासून ऑनलाइन परवानग्या देण्याचे पालिका प्रशासनाने ठरवले आहे. मंडप उभारणी परवानगीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 ऑक्टोबर असून या तारखेपर्यंत येणाऱया सर्व अर्जांना न्यायालयाच्या आदेशानुसार परवानग्या दिल्या जाणार आहेत.
ऑनलाइन परवानग्या देताना उच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या अटींनुसारच परवानग्या द्याव्यात. अग्निशमन नियम, पदपथ पादचाऱयांना मोकळे ठेवणे, वाहतुकीस अडथळा होऊ न देणे इत्यादी अटींची पूर्तता झाल्याची खात्री करून घेण्याचे तसेच परवानगीनुसारच मंडप उभारणी झाल्याचीही खातरजमा करावी, असे निर्देश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आढावा बैठकीदरम्यान अधिकाऱयांना दिले.
























































