
>>मेधा पालकर
दोन वर्षांची कोविड महामारी हळूहळू ओसरली. या संपूर्ण लॉक डाऊन काळात बंद असलेल्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरू झाल्या, मात्र पूर्व प्राथमिक शाळा नुकत्याच 2 मार्चपासून सुरू झाल्या. लॉक डाऊन काळात घरातच लॉक झालेली मुलं अनलॉकनंतर हळूहळू बागडू लागली. या वातावरणाचा सर्वात जास्त फटका लहान मुलांना बसलेला दिसला. बागेत, मोकळ्या मैदानावर बागडण्याचा काळ त्यांना घरातच काढावा लागला. त्यामुळे मुलं जास्तच हळवी, थोडी घाबरलेली, समवयस्क मुलांमध्ये न खेळता आपल्या वयापेक्षा मोठय़ा आणि आपल्याला समजून घेणाऱया मुलांमध्ये खेळणं असे काही बदल त्यांच्यामध्ये दिसून आले. हे बदल घेऊन जेव्हा मार्चपासून ऑनलाइन असलेली शाळा अचानक ऑफलाइन सुरू झाली तेव्हा खूप मुलं आपल्या बरोबरीच्या मुलांमध्ये रुळत नव्हती. पूर्वी प्राथमिक शाळेत येणारी आणि लॉक डाऊननंतर शाळेत आलेल्या मुलांमध्ये हा वागणुकीतला बदल जाणवत आहे. बाल मानसिकता लक्षात घेऊन खूप मेहनत घेतली. ऑनलाइनकडून ऑफलाइन शिक्षणाकडे सुरू झालेला प्रवास आणि त्यांचा सामाजिक विकास होणं किती गरजेचा आहे, हे विविध क्षेत्रातील मान्यवरांशी बोलून शब्दात मांडण्याचा केलेला हा प्रयत्न.
होम स्कूलिंग करण्याचा प्रयत्न या लोक डाऊनमध्ये झाला. मधल्या काळात शाळा काही वेळ सुरू झाल्या, पण पुन्हा त्या बंद झाल्या. जी मुलं शाळेत जाताहेत त्यांना शाळा ही संकल्पनाच माहिती नव्हती. ज्युनियर, सीनिअर यांना शाळा माहिती आहे, पण जे शिशू गटात आहेत ते वर्षभर ऑनलाइन शाळेत बसत होते. अचानक शाळा सुरू झाल्याने त्यांना शाळा ही माहिती करून घ्यावी लागेल. मुलं रुळायला आणि त्यांची इतरांशी मैत्री व्हायला वेळ लागणार आहे, मात्र ती शाळेत जायला रडतात म्हणून त्यांना शाळेत पाठवायचे नाही असं करून चालणार नाही. मुलगा शाळेत जातच होता. घरी आला की आई-बाबा घरात आहेत हे त्याला माहिती होतं. आता फरक एवढाच आहे की, मुलं कोविड काळात जास्त काळ घरात राहिली. त्यामुळे मुलांना घरात कोंडल्यासारखं झालं होतं. ती घरात अडकून पडली. आता त्यांना शाळेत घालायची खरी वेळ आहे. शाळेत गेलं की, एकत्र डबा खाण, ऑक्टिव्हिटी करणं, एकत्र खेळणं ही कल्पना त्यांना समजते. जी मुलं आईवडिलांना सोडून अजिबात राहिली नाही त्यांना थोडं अवघड गेलं, पण होम स्कूलिंग या संकल्पनेत सामाजिक विकास होत नाही. शिस्त, मिळून मिसळून खेळणं या गोष्टी घरात शिकविल्या जाऊ शकत नाहीत. मुलं भावनिक नक्कीच झाली आहेत, पण आईबाबांनी विश्वास द्यायला हवा की, दोन-तीन तासांची तुझी शाळा आहे. आम्ही तुला परत घ्यायला येणार आहोत. दोन वर्षांची दरी दोन दिवसांत कमी होणार नाही, त्याला वेळ तर द्यावाच लागणार आहे.
-रचना श्रोतीय, एज्युकेशनिस्ट
कोविडपूर्वीच्या शाळा जेव्हा सुरू व्हायच्या तेव्हा मुलांना शिक्षक दिसायचे. लॉक डाऊनमध्ये मुलांना ऑनलाइन शाळेत शिक्षक दिसले. त्यामुळे त्यांना जेव्हा शाळा सुरू झाल्या तेव्हा त्यांना शिक्षक ओळखीचे वाटले. फक्त मुलाचं एकमेकांमध्ये मिसळणं त्यांना अवघड गेलं. मुलांमध्ये घाबरडेपणा वाढलेला आहे. लॉक डाऊनमुळे मुलं बाहेर पडली नाहीत. जी मुलं पाळणाघरात राहात होती, ग्राऊंडला जात होती, मुलांचा सामाजिक विकास होत होता. काही मुलं तर स्वतःची बॅगसुद्धा काढत नाही. माझी बॅग हरवेल याची भीती त्यांना आहे. शाळा आणि घर यामधला पूल पालक झाले. डबा खाण्यावरून दिसते की त्यांना घरी आई खाऊ घालते, पण हेच त्यांना खेळायला सोडलं तर त्यांना काय खेळू काय नाही असं होतं. जेव्हा खेळणी पाहतात तेव्हा त्यांना खूप आनंद होतो. नेतो शाळेच्या तर त्यांना ते खूप आवडत आहे. अभ्यास काय करायचा यापेक्षा त्यांचा शारीरिक विकास कसा होईल यावर लक्ष केंद्रित केलं आहे. पळापळी मिळाली नाही, मातीत खेळता आलं नाही. सर्दी होईल या भीतीने ते बाहेर पडले नाहीत. जेव्हा शारीरिक वाढ चांगली होते तेव्हा ग्रॉस डेव्हपमेंट चांगली होते. त्यांना शरीराचा तोल सांभाळता आला की, आपोआप त्यांचे फिंगर मोटर डेव्हलप होतात. दीड-दोन महिन्यांत त्यांना जेवढी तोंडी माहिती देता येईल तेवढं आम्ही करतो आहोत.
-उमा जटार, अनुभवी शिक्षिका
मुलं आनंदाने शाळेत जातात असं साधारण दिसतं आहे. काही मुलं अशी आहेत की, कोरोनाच्या काळात घरात अतिरेकी एंझायटी झाली. घराबाहेर पाय ठेवायला परवानगी नव्हती. दुसरा असा एक ग्रुप आहे की, पालक स्वतः खूप घाबरून गेले. त्यांनी मुलांना बाहेर जाऊ दिलं नाही. त्याचा फटका मुलांना बसतो. घरातली माणसं कशी वागतात ही मुलांच्या हातातली गोष्ट नाही. त्यामुळे पालकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. कारण मुलं आपण जे सांगतो त्यावर स्वतःचं मत बनवतात. रोज जे ऑनलाइन शाळेत दिसते तेच शिक्षक तुला शिकवणार आहेत. शाळेत तुला खेळायला मिळणार आहे, अशा प्रकारे मुलांना सांगितलं तर मुलं शाळेत जायला तयार होतील. शाळांना माहिती असतं की, इतक्या दिवसांनी शाळेत येणाऱया मुलांना कसं हाताळायचं, त्यांच्याशी कसं खेळायचं. मुलांशी सकारात्मक बोलायला हवं, मुलांना बाहेर खेळायला घेऊन जायला पाहिजे. त्यांना भीती आहे घर सोडून जायची. ती कमी केली पाहिजे.
-डॉ. भूषण शुक्ला, बालमानसोपचारतज्ञ
शाळा सुरू होण्याअगोदर मुलांना घेऊन बागेत जाणं, जमेल तेवढं लोकांना भेटणं हे करणं गरजेचं होतं. ते ज्यांना जमलं नाही अशा मुलांना एकदम शाळा सुरू झाल्यानंतर शाळेत रुळणं कठीण झालं. अर्थात परिस्थितीही कोविडचा प्रादुर्भाव जास्त असल्यामुळे बाहेर फिरण्यायोग्य नव्हती. घरात जास्त राहिल्यामुळे इतर माणसांशी त्यांचा संबंध आला नाही. मुलांना शाळा, शिक्षक, मित्र हे नवीन वाटणार आहेत. त्यामुळे हळूहळू ते घाबरणार नाहीत. मुलांनी घरातल्या माणसांशिवाय इतर कोणाला पाहिलं नाही. वर्गात इतक्या संख्येने असलेल्या मुलांना पाहिलेलं नाही. त्यामुळे मुलांना वेळ द्यावा लागणार आहे. शाळेत का नको वाटतं हे सांगता येत नाही. पुरेसे शब्द माहिती नाहीत, अशी त्यांची स्थिती आहे. त्यामुळे या मुलांना आता सुट्टीच्या कालावधीत बागेत नेले पाहिजे. बाग ही भीती जाण्यासाठी खूप महत्त्वाची आहे.
-श्रुती पानसे, एज्युकेशनिस्ट
शाळा सुरू झाली की, मुलांची रडारड हा प्रसंग जून महिन्यात आम्ही अनुभवतो. तो प्रसंग आम्ही मार्चमध्ये अनुभवला. लॉकडाऊन असले तरी शाळा ऑनलाइन सुरू होत्या. मुलांना शाळेतल्या शिक्षिका माहिती झाल्या. जी मुलं पाळणाघरात जात नव्हती, मैदानावर खेळू शकली नाही ती थोडी घरी राहून एकलकोंडी झाली. त्यांच्यामध्ये शाळेत आल्यानंतर खूप बदल जाणवला. आता मुलं हळूहळू शाळेत सेटल होतायेत. क्लासमध्ये बसायला लागलेत. मुलं बराच काळ घरात राहिल्यामुळे बॅगेतून पुस्तकं काढणे, डबा हाताने खाणे या क्रिया त्या सहजपणे करत नाहीत. वर्गातल्या शिक्षिका, मावशी यांच्या मदतीने ते करत आहेत. अभ्यासाच्या बाबतीतसुद्धा ज्या मुलांना पालक मदत करायचे त्यांना अभ्यास नको वाटतो. त्यांना स्वावलंबी करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
– माधुरी बर्वे, डीईएस, प्री प्रायमरी स्कूल, मुख्याध्यापिका

























































