हिंदुस्थानात केवळ 23 टक्के नोकरदार; 94 टक्क्यांसह अमेरिका अव्वल, श्रीलंका, चीन आणि बांगलादेशही पुढे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशामध्ये महिला कर्मचाऱ्यांचे उत्पन्न हे पुरुषांपेक्षा तब्बल 25 टक्क्यांनी कमी आहे. देशामध्ये नोकरदारांचे सरासरी मासिक उत्पन्न हे इतर काम करणाऱ्यांच्या तुलनेत जास्त आहे. हिंदुस्थानात अन्य देशांच्या तुलनेत नोकरी करणाऱ्यांचे प्रमाण खूपच कमी आहे. हिंदुस्थानात केवळ 23 टक्के लोक हे नोकरदार आहेत, अशी माहिती डेटा फॉर इंडिया, वर्ल्ड डेव्हलपमेंट इंडिकेटर्स (वर्ल्ड बँक), पीएलएफएस सर्वेक्षणातून समोर आली आहे. नोकरी करणाऱ्या 85 टक्के लोकांना ग्रॅच्युइटी मिळत नाही. यात केवळ 15 टक्के लोकांना लाभ मिळाला आहे. नोकरी करणारे 72 टक्के लोक हे आरोग्य सुविधेपासून वंचित आहेत. यामध्ये केवळ 28 टक्के लोकांना लाभ मिळाला आहे, तर पेन्शन 57 टक्के लोकांना आणि पीएफ केवळ 43 टक्के लोकांना मिळाल्याचेही या अहवालात म्हटले आहे.

2024 मध्ये एका सरासरी पगारदार कर्मचाऱयाचे मासिक उत्पन्न हे जवळपास 21 हजार रुपये होते. तर स्वयंरोजगार करणाऱ्याचे 13 हजार 200 रुपये तसेच रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुराचे केवळ 9 हजार रुपये होते.

राज्यांमध्ये पंजाब पहिल्या नंबरवर

पंजाब हे 56 टक्क्यांसोबत पगारदारांमध्ये पहिल्या नंबरवरील राज्य आहे. दुसऱ्या नंबरवर 31 टक्के गुजरात असून तिसऱ्या नंबरवर महाराष्ट्र आहे. हरियाणा 26 टक्के, राजस्थान 19 टक्के, झारखंड 16 टक्के, छत्तीसगड 14 टक्के, मध्य प्रदेश 13 टक्के, बिहार 9 टक्के पगारदार आहेत.

जर्मनी, जपान, ब्रिटनचा दबदबा

हिंदुस्थानात अन्य देशांच्या तुलनेत नोकरी करणाऱ्यांचे प्रमाण खूपच कमी आहे. हिंदुस्थानात केवळ 23 टक्के लोक हे नोकरदार आहेत. अमेरिकेत 94 टक्के, जर्मनी 91 टक्के, जपान 89 टक्के, ब्रिटन 87 टक्के, आफ्रिका 83 टक्के, श्रीलंका 58 टक्के, चीन 54 टक्के, बांगलादेश 46 टक्के वेतनधारक आहेत. याचाच अर्थ हिंदुस्थानातील वेतनधारकांची संख्या ही श्रीलंका, बांगलादेश, चीन या शेजारी राष्ट्रांपेक्षाही कमी आहे.