
सामना ऑनलाईन,अयोध्या
अयोध्येत रामलल्लाला आता भव्य मंदिरात स्थापन करण्याची वेळ आली असून शिवसेनेच्या माध्यमातून मंदिर निर्मिती निश्चितच होईल असा ठाम विश्वास अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनी व्यक्त केला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दसऱ्यानंतर अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या नियोजित दौऱ्याआधी अयोध्येतील एकूण स्थितीची पाहणी करण्यासाठी आणि तेथील प्रमुख संतमहंतांशी चर्चा करण्यासाठी शिवसेना नेते खासदार संजय राऊत आज येथे आले होते. यावेळी त्यांनी रामलल्ला मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांच्याशी संवाद साधला. या भेटीनंतर सत्येंद्र दास पत्रकारांशी बोलत होते.
राममंदिर निर्मितीबाबत सत्ताधारी भाजपाच्या नेत्यांना अनेकदा भेटूनही त्यांच्याकडून काहीच उत्तर आले नाही अशी खंत सत्येंद्र दास यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. भाजप नेते मंदिर प्रकरण न्यायालयात असल्याचे प्रत्येक वेळी सांगतात पण निवडणुकीपूर्वी त्यांनी घोषणापत्रात मंदिर निर्मितीची घोषणा केली होती तेव्हाही न्यायालयात प्रकरण सुरूच होते याची आठवण दास यांनी करून दिली.
न्यायालय हे कोणत्याही सरकारचे नसते, ते स्वतंत्र असते असे सांगतानाच मंदिरप्रश्नी जर न्यायालय निर्णय घेणार असेल तर मग आम्ही भाजपाला साथ का द्यावी, असा सवाल दास यांनी यावेळी केला. न्यायालय निर्णय घेत असेल तर चांगली गोष्ट आहे, पण ‘रामलल्ला हम आयेंगे, मंदिर वही बनायेंगे’ असे म्हणत मंदिरासाठी केलेले आंदोलन कुणी न्यायालयाला विचारून केले नव्हते असेही ते म्हणाले.
कौतुक आणि आशीर्वाद
मंदिर निर्मितीसाठी आग्रही असलेल्या आणि त्या दिशेने सक्रीय झालेल्या शिवसेनेचे सत्येंद्र दास यांनी या वेळी कौतुक करतानाच मंदिर उभारणीसाठी आशीर्वादही दिला. ते म्हणाले की, शिवसेना शक्तिशाली आहे आणि शिवसेनेनेही अयोध्येत राम मंदिर व्हावे यासाठी खूप काम केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येला येतील तेव्हा यासंदर्भात पुन्हा बैठक होईल, असे ते म्हणाले. आता भाजपा नाही, सर्व संतमंडळी आणि रामभक्तांनी मंदिर बनवण्याबाबत निर्णय घ्यावा, असेही ते म्हणाले.


























































