‘महावितरण’च्या वीज दरवाढीबाबत आजपासून राज्यभर जनसुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

‘महावितरण’ने महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे तब्बल ३० हजार कोटी रुपयांच्या वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यावर वीज आयोगाने ग्राहकांकडून सूचना व हरकती मागवल्या असून सोमवार,  ६ ऑगस्टपासून राज्यभर जनसुनावणी होणार आहे. त्याची सुरुवात अमरावती येथून होणार आहे.

महावितरणचे राज्यभर कार्यक्षेत्र असून ते २ कोटी ४० लाख ग्राहकांना वीजपुरवठा करते. महावितरणने २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी मध्यावधी वीज दरवाढ याचिका आयोगाकडे दाखल केली आहे. याबाबत ग्राहकांचे गार्‍हाणे ऐकून घेण्यासाठी आयोगाने राज्यभर जनसुनावणी आयोजित केली आहे. त्यानुसार सोमवारी अमरावती येथे सकाळी दहा वाजता या सुनावणीला सुरुवात होणार आहे. मंगळवार ७ ऑगस्ट रोजी नागपूर, ९ ऑगस्टला पुणे, शनिवार ११ ऑगस्ट रोजी संभाजीनगर येथे जाहीर सुनावणी होणार आहे तर सोमवार १३ ऑगस्टला नाशिक आणि गुरुवार १६ ऑगस्ट रोजी नवी मुंबई येथील आगरी-कोळी भवन नेरूळ येथे जनसुनावणी होणार आहे. या सुनावणीला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून वीज दरवाढीवर हरकती नोंदवाव्या असे आवाहन महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी केले आहे.