मुक्त विद्यापीठाची पदवी प्रमाणपत्रे उपलब्ध होणार डिजिलॉकरद्वारे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना त्यांची पदवी प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे उपलब्ध होणार आहे. नुकतेच डिजिलॉकर या प्रणालीचे उद्घाटन डॉ.ई. वासुनंदन यांच्या हस्ते करण्यात आले. पहिल्या टप्प्यात मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2018-19 व 2019-20 मधील मे 2019 व मे 2020 मध्ये झालेल्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण 2 लाख 90 हजार विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र हे डिजिलॉकरमध्ये उपलब्ध होणार आहेत. इतर विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्रेही टप्प्याटप्प्याने डिजिलॉकरमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

विद्यार्थ्यांना  digilocker.gov.in  या वेबसाईटवर किंवा डिजिलॉकर हे अॅप मोबाईल प्लेस्टोअरवरून डाऊनलोड करून आपल्या आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांकाद्वारे नोंदणी करता येईल. विद्यार्थ्यांनी ‘एज्युकेशन’ या विकल्पावर क्लिक करून आपल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे नाव निवडावे व नंतर पदवी प्रमाणपत्र हा विकल्प निवडून आपली शैक्षणिक माहिती भरल्यानंतर विद्यार्थ्यास त्याचे पदवी प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात डिजिलॉकरने उपलब्ध होईल. प्रमाणपत्रावर क्यूआरकोड असून त्यास स्पॅन केल्यास आपली शैक्षणिक माहिती उपलब्ध होईल. ज्या विद्यार्थ्यांनी पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करतेवेळी आपला आधार क्रमांक नोंदविला आहे, अशा विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र आधार क्रमांकाला डिजिलॉकरमध्ये लिंक करण्यात आलेले आहे. डिजिटल पदवी प्रमाणपत्रावर डिजिटल साईन असून त्यास माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार कायदेशीर वैधता राहील.