
हिंदुस्थान-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी राज्यातील रुग्णालयेही सज्ज झाली आहेत. वैद्यकीय शिक्षण संचालक आणि आरोग्य संचालकांच्या उपस्थितीत आज मुंबईत वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता आणि वरिष्ठ आरोग्य अधिकाऱयांची चर्चा झाली. पेंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे सर्व सज्जता ठेवण्यात याव्यात अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या. डॉक्टरांच्या सुट्टय़ाही रद्द करण्यात आल्या आहेत.
आरोग्य सेवा आणि रुग्णालये अत्यावश्यक सेवेमध्ये मोडत असल्याने आणीबाणीच्या परिस्थितीत त्यांनी अधिक दक्ष राहिले पाहिजे याबाबत या बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले. औषधे, ऑक्सिजन, अॅम्ब्युलन्स व अन्य अत्यावश्यक उपचार सुविधा सज्ज ठेवा, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
रुग्णालयांना सूचना….
सर्व अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी पुढील आदेश मिळेपर्यंत कर्तव्यावर उपस्थित रहावे.
रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन वाहने सर्व आवश्यक जीवनरक्षक प्रणालीसह सहज उपलब्ध व्हावीत.
सर्व आवश्यक औषधांची उपलब्धता सुनिश्चित करावी.
सर्व आवश्यक उपकरणे, स्ट्रेचर, ऑक्सिजन आणि इतर जीवनरक्षक प्रणालीची तसेच बेडची उपलब्धता सुनिश्चित करावी.
फिरते वैद्यकीय पथक सक्षमपणे कार्यान्वित असल्याची खात्री करून घ्यावी.
रक्तपेढय़ा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित ठेवण्यात याव्यात.
सर्व आरोग्य किट, अतिरिक्त डिस्पोजेबल वस्तूंसह ऑपरेशन थिएटर्स कार्यान्वित राहील याची दक्षता घेण्यात यावी.
चाचणी प्रयोगशाळा संपूर्ण क्षमतेने कार्यान्वित ठेवण्यात याव्यात.
आवश्यकतेप्रमाणे मॉकड्रिल घेण्यात यावे.
ब्लॅकआऊट झाल्यास संस्थेची आपत्कालीन सेवा चालू राहील. मात्र ब्लॅकआऊटची अंमलबजावणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शनाप्रमाणे करावी.