
संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांचा आवाज दाबण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या मनमानी धोरणाविरोधात आज राज्यसभेत प्रचंड मोठा उद्रेक पाहायला मिळाला. लोकसभेतील वादाचे पडसाद राज्यसभेतही उमटले असून, विरोधकांच्या तीव्र घोषणाबाजी आणि गदारोळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले भाषण रेटून नेले. राज्यसभेत विरोधकांनी ‘लोकशाही वाचवा’ आणि ‘तानाशाही नही चलेगी’ (हुकूमशाही बंद करा) च्या घोषणांनी सभागृह दणाणून सोडले होते.
विरोधकांचा आक्रमक पवित्रा
लोकसभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांच्या संदर्भातील मुद्द्यांवर बोलण्यापासून रोखण्यात आल्याने विरोधक आधीच संतप्त होते. त्याचेच प्रतिबिंब आज राज्यसभेत पाहायला मिळाले. पंतप्रधान मोदी भाषणासाठी उभे राहताच विरोधी पक्षांच्या खासदारांनी सभागृहाच्या मध्यभागी (वेलमध्ये) येऊन जोरदार घोषणाबाजी सुरू केली. सत्ताधारी पक्ष जाणीवपूर्वक महत्त्वाच्या मुद्द्यांवरून लक्ष भरकटवत असल्याचा आरोप विरोधकांनी यावेळी केला.
पंतप्रधानांचे भाषण आणि गोंधळ
विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे सभागृहात कानठळ्या बसवणारा आवाज होता, तरीही पंतप्रधान मोदींनी आपले भाषण थांबवले नाही. त्यांनी आपले म्हणणे मांडणे सुरूच ठेवले. एका बाजूला विरोधक प्रश्नांची उत्तरे मागत होते, तर दुसऱ्या बाजूला पंतप्रधान आपल्या सरकारच्या योजनांचा पाढा वाचत होते, आपल्या सरकारची पाठ थोपटून घेत होते. विरोधकांच्या मागणीकडे मात्र सभापतींनी दुर्लक्ष करत कामकाज सुरूच ठेवल्याने विरोधकांनी सभात्याग न करता आपला विरोध नोंदवणे सुरूच ठेवले.
राजकारण तापलं
सभागृहाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना विरोधी नेत्यांनी भाजप सरकारवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. ‘जेव्हा देश सुरक्षेच्या मुद्द्यावर आणि लष्करी प्रश्नांवर उत्तरं मागतो, तेव्हा सरकार पळ काढते. संसदेत केवळ सत्ताधाऱ्यांचेच चालणार असेल, तर त्याला लोकशाही म्हणता येणार नाही’, अशी टीका विरोधकांनी केली.
rajya sabha ruckus: opposition protests against bjp govt, pm modi speaks amid chaos
opposition mps protest in rajya sabha against the government’s arbitrary policies. pm narendra modi delivers his speech despite loud slogans and uproar in the house.





























































