
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अखेरच्या दिवशीही ‘मतचोरी’चा मुद्दा गाजला. विरोधकांनी मतचोरी व बिहारमधील मतदार फेरपडताळणीवर चर्चेचा आग्रह धरला, मात्र त्यास परवानगी न मिळाल्याने विरोधक कमालीचे आक्रमक झाले. लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोरच ‘वोट चोर, गद्दी छोड…’, ‘गली गली में शोर है…’ अशा घोषणा देत विरोधकांनी सभागृह दणाणून सोडले.
लोकसभेचे कामकाज सुरू होताच काँग्रेसचे मणिकम टागोर यांनी स्थगन प्रस्ताव मांडून एसआयआरविषयी चर्चा करण्याची मागणी केली , मात्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कुठलाही स्थगन प्रस्ताव स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट करत प्रश्नोत्तराचा तास पुकारला. त्यावरून गदारोळ सुरू झाला. त्यामुळे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. पुन्हा सभागृह सुरू झाल्यानंतरही विरोधकांनी एसआयआरवर चर्चेचा मुद्दा लावून धरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात आल्यामुळे विरोधक अधिकच आक्रमक झाले. त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. ‘वोट चोर गद्दी छोड…’, ‘एसआयआरवर चर्चा झालीच पाहिजे…’ अशा घोषणा देण्यात आल्या. या गदारोळातच ओम बिर्ला यांनी अधिवेशनात झालेल्या कामकाजाची माहिती देण्यास सुरुवात केली. ते बोलत असतानाही विरोधकांची घोषणाबाजी सुरूच राहिली. अखेर कामकाज अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करण्यात आले.
राज्यसभेतही सरकारची कोंडी
राज्यसभेत सभापतींनी ऑनलाइन गेमिंगसंबंधी विधेयकावर चर्चा घेण्याची घोषणा केली, मात्र, विरोधकांनी मतचोरीच्या मुद्दय़ावर स्थगन प्रस्तावाची मागणी केली. ती नाकारली गेल्यामुळे गदारोळ झाला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज सुरुवातीला 2 वाजेपर्यंत आणि नंतर अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले.