दातांना टूथपेस्ट लावण्यापूर्वी ब्रश ओला का करू नये, दंतवैद्यांनी सांगितले कारण; वाचा सविस्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सकाळी उठल्यावर प्रत्येक जण तोंड आणि दातांची स्वच्छता करतो. त्यानंतरच कोणत्याही कामाला सुरुवात केली जाते. विज्ञान असे सांगते की, 2 ते 3 मिनिटे तरी दातांना ब्रश करणे गरजेचे आहे, तर तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, बहुतांश लोक चुकीच्या पद्धतीने ब्रश करतात. दातांची स्वच्छता करताना काही गोष्टींबाबत काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

अनेकदा लोकं तोंडाच्या आरोग्याची काळजी घेताना काही सामान्य चुकाही करतात. ज्या त्यांच्यासाठी भविष्यात धोकादायक ठरू शकतात. अशा अनेक चुकांपैकी एक चूक म्हणजे, ब्रशवर टूथपेस्ट लावण्यापूर्वी लोकं टूथब्रश ओला करतात किंवा पाण्याखाली धुतात. दंतवैद्यांच्या मते, तुम्ही असे करत असाल तर ते चुकीचे आहे, असे का करू नये, जाणून घेऊया.

दंतवैद्यांच्या म्हणण्यानुसार, टुथपेस्टमध्ये आधीच योग्य प्रमाणात आर्द्रता असते. जर तुम्ही ब्रशही ओला केला तर जास्त ओलाव्यामुळे टुथपेस्टला फेस लवकर येतो. जर तुमचा टूथब्रश ओला असेल, तर फेस लवकर येईल आणि तुमच्या तोंडातून टूथपेस्ट लवकर निघेल. याशिवाय जोर लावून दात घासणे, इंटरडेंटल ब्रशला फ्लॉस लावून ब्रश केल्याने तोंडाचे आरोग्य बिघडू शकते.

याबाबत अनेकांना प्रश्न पडतो की, ब्रश धुतला नाही, तर त्यामध्ये धूळ शिरू शकते. धूळ टाळण्याकरिता काय करावे? याविषयी दंतवैद्यांचे असे म्हणणे आहे की, टूथब्रशचे धुळीपासून रक्षण होण्यासाठी ब्रशला कॅप लावावी. ब्रश केल्यानंतर स्वच्छ धुतल्यानंतर ही कॅप ब्रशला लावल्याने ब्रशमध्ये धूळ जाणार नाही.

ब्रशने दात योग्य पद्धतीने घासले जात नसतील, ब्रश कडक असेल तर असा ब्रश वापरणे शक्यतो टाळावे. ब्रश स्वच्छ असावा, कारण दात स्वच्छता करताना दातांच्या फटींमध्ये अडकलेले अन्नकणही यामुळे सहज निघू शकतील. जेथे टूथब्रश पोहोचत नाही तेथे फ्लॉसचा वापर करून दात स्वच्छ करावेत.

दिवसातून अनेक वेळा ब्रश करण्याऐवजी एकदाच सकाळी उठल्यावर व्यवस्थित ब्रश करावा. नियमित दात व्यवस्थित स्वच्छ न केल्यास तोंडाच्या आणि दातांच्या आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतात. जर योग्य पद्धतीने दिवसातून एकदा दातांना ब्रश केल्यास तोंड आणि दातांचे आरोग्य चांगले राहते याकरिता त्यांनी सकाळी उठल्यावर योग्य पद्धतीने ब्रश करण्याचा सल्ला दिला आहे.

रात्री झोपण्यापूर्वीही ब्रश करा
जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तोंडातील लाळ कमी होते. यामुळे रात्रीच्या जेवणातील अन्नपदार्थ तुमच्या दातात अडकू शकतात. यामुळे दात खराब होण्याची मोठी समस्या निर्माण होऊ शकते. म्हणून रात्री झोपण्यापूर्वीही ब्रश करणे गरजेचे असल्याचा सल्ला दंत वैद्यांनी दिला आहे.