
एक्झिबिशन सेंटर तसेच साधुग्राम उभारण्याच्या नावाखाली प्रशासनाने तपोवनातील अठराशे वृक्ष तोडण्याचा घाट घातला आहे. गेल्या वीस दिवसांपासून विविध संघटना, पर्यावरणप्रेमी आपापल्या परीने या वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी सरसावले आहेत. आज रविवारी ऑर्केस्ट्रा, पथनाट्य, शोक संमेलन, वनभोजनासारख्या निरनिराळ्या उपक्रमांतून पर्यावरण वाचवण्याचा संदेश देण्यात आला.
तपोवन कृती समिती व नाशिक जिल्हा ऑर्केस्ट्रा असोसिएशन यांच्या वतीने रविवारी सकाळी तपोवनातील झाडाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात अनेक नाशिककर गायकांनी गाण्यांचे सादरीकरण केले. तपोवनातील वृक्ष वाचवण्यासाठी आज सकाळपासूनच आबालवृद्ध एकवटले होते. मानवाधिकार संरक्षण संस्था, निरनिराळे पर्यावरणप्रेमी समूह एकत्र आले. सुप्रसिद्ध लेखक राजन खान, अक्षर मानव, पक्षीमित्र सीमा तंगडपल्लीवार, किर्लोस्कर वसुंधरा पुरस्कार सन्मानित पर्यावरणमित्र उमाकांत निखारे यांनीही तेथे भेट दिली, होणाऱ्या वृक्षतोडीबद्दल नाराजी व्यक्त केली. नाशिक सायकलिस्ट असोसिएशनचे सहकारीही निसर्गाचा घात थांबविण्याची प्रशासनाला विनंती करत होते. काही पर्यावरणप्रेमींनी वनभोजन केले. तेथे बुद्धिबळ, सूरपारंब्याचा खेळ रंगला. तरुण कलाकारांनी पथनाट्य सादर केले. जमलेल्या नागरिकांनी एकमेकांचे हात हातात घेत वृक्षांभोवती मोठे रिंगण करत हात उंचावून तपोवन वाचविण्याची हाक दिली. ‘या रे या, सारे या, लाकूडतोडय़ाला शिकवू या, झाडे आपण जपू या, नाशिक आपण वाचवू या’ असा ठेका धरत नाशिककरांनी आज विसाव्या दिवशीही ‘तपोवन वाचवा’ मोहीम सुरू ठेवली.
नाशिकचे अरुण गवळी, सत्यजित पाटील यांच्या समन्वयाने रविवारी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेदरम्यान ‘झाडांसोबत – एक कविता, एक दिवस’ या पहिल्या उपरोधिक शोक संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात नाशिकसह नांदेड, पुणे, अहिल्यानगर, हिंगोली येथील कवींनी कविता सादर केल्या. वृक्षतोड करू पाहणाऱ्या सरकारचा धिक्कार केला.
दरम्यान, महापालिकेने परिसरातील वृक्षांबाबत जाणकारांशी चर्चा करण्याचे निश्चित केले असून त्यानुसार वीस वृक्षप्रेमी, अभ्यासकांना सोमवारी दुपारी महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्याशी चर्चा करण्यासाठी निमंत्रित केले आहे. मात्र, काही निवडक लोकांनाच चर्चेसाठी बोलावून महापालिका पर्यावरणप्रेमींमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.




























































