मूळ कागदपत्रे दिल्यावरच विद्यार्थ्याचा प्रवेश ‘कन्फर्म’ होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या गुणवत्ता यादीत नाव आलेला विद्यार्थी संबंधित कॉलेजमध्ये जाऊन आपली मूळ कागदपत्रे जमा करीत नाहीत तोवर कॉलेजने त्या विद्यार्थ्याचा अकरावी प्रवेश ‘कन्फर्म’ करू नये, अशा सूचना शिक्षण उपसंचालक कार्यालयाने जारी केल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या मूळ कागदपत्रांशिवाय ऑनलाईन प्रवेशाच्या वेबसाईटवर प्रवेश अपडेट करणाऱया कॉलेजांवर कारवाईचा इशाराही उपसंचालक कार्यालयाने दिला आहे.

यंदा प्रथमच अकरावी प्रवेशअर्जात ‘क्लिक फॉर प्रोसीड’ या पर्याय देण्यात आला आहे. गुणवत्ता यादीत विद्यार्थ्यांचे नाव आल्यास त्या विद्यार्थ्याला संबंधित कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर विद्यार्थी ‘क्लिक फॉर प्रोसीड’ वर क्लिक करून आपली सहमती नोंदवू शकतात. विद्यार्थ्याने सहमती नोंदविल्यानंतर कॉलेज अशा विद्यार्थ्यांच प्रवेश कन्फर्म करून अकरावीच्या वेबसाईटवर याविषयी अपडेट टाकू शकतात. पण पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी क्लिक फॉर प्रोसीडवर सहमती दर्शविल्याने काही कॉलेजनी अशा विद्यार्थ्यांचा प्रवेश अपडेट केला आहे. मात्र आता यातील काही विद्यार्थ्यांना त्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा नाही पण कॉलेजनी त्यांचा प्रवेश अपडेट केल्याने हे विद्यार्थी प्रवेशप्रक्रियेबाहेर गेले आहेत.

यातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे याविषयी तक्रार केल्यानंतर सोमवारी शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे याविषयीच्या सूचना जारी केल्या. जोपर्यंत विद्यार्थी प्रत्यक्ष प्रवेश घेण्यासाठी कॉलेजमध्ये येऊन मूळ कागदपत्रे देऊन प्रवेश निश्चित करीत नाही तोवर अशा विद्यार्थ्यांचा प्रवेश अपडेट करू नये. मूळ कागदपत्रांशिवायच विद्यार्थ्यांचा प्रवेश अपडेट करणाऱया कॉलेजांवर कारवाई करण्याचा इशाराही अहिरे यांना दिला.

– अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक कोलमडले
मुसळधार पावसामुळे अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक कोलमडले आहे. पहिल्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश घेण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. सोमवारी पहिल्या यादीतील प्रवेश घेण्यासाठी शेवटची संधी होती. पण पावसामुळे वाहतूक विस्कळीत झाल्याने ही मुदत मंगळवार, १० जुलै सायंकाळी ५ वाजेपर्यंत वाढविण्यात आली. ज्युनियर कॉलेजना पहिल्या फेरीतील प्रवेश अपडेट करण्यासाठीही मंगळवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुदत आहे. नियोजित वेळापत्रकानुसार १० जुलैला दुसऱया यादीसाठी रिक्त जागा आणि कॉलेज कटऑफ जाहीर होणार होता पण हा तपशील आता परवा ११ जुलैला जाहीर होणार आहे.