तरुणीच्या जयपुरी कुर्त्याच्या आधारे लावला पोलिसांनी खुनाचा छडा, तिघांना आजन्म कारावासाची शिक्षा

1735

धाराशिवसह महाराष्ट्रभर गाजलेल्या धाराशिव तालुक्यातील वाघोली खून प्रकरणातील तरुणीच्या मारेकऱ्यांना येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सदरील खून प्रकरणात केवळ तरुणीने घातलेल्या जयपुरी कुर्त्याच्या आधारे तत्कालीन सहाय्यक पोलिस अधिक्षक तथा सध्याचे जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक राजतिलक रोशन यांनी करुन तपास करुन या प्रकरणाचा छडा लावला होता.

वाघोली येथील सार्वजनिक पाणीपुरवठय़ाच्या विहिरीत एका तरूणीचा पोत्यात गुंडाळलेल्या मृतदेह 21 डिसेंबर 2015 रोजी सायंकाळी गावकऱ्यांना आढळला होता. यानंतर धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 302, 201 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. शवविच्छेदन अहवालात तरुणीचा गळा चिरून खून केल्याचे स्पष्ट झाले होते, परंतु सुरुवातीच्या कांही दिवसात तपासाला दिशा मिळत नव्हती, तसेच या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून तत्कालीन सहाय्यक पोलिस अधिक्षक राज तिलक रोशन यांच्याकडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला.

आरोपीने सर्व पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह तागाच्या पोत्यात भरून टाकला होता. त्यामुळे तरुणीची ओळख पटत नव्हती. या तरुणीच्या अंगात असलेल्या एका जयपुरी कुर्तीवर लक्ष केंद्रित करून व सखोल तपास करून राज तिलक रोशन यांनी या खुनाचा छडा लावला होता.

तपासादरम्यान मयत तरुणीही फरसाना पुणे पोलीस स्टेशन हद्दीतील कांचन परदेशी ही असून सदर मुलगी बेपत्ता असल्याबद्दल जुलै 2015 मध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. या तरुणीचे धाराशिव तालुक्यातील वाघोलीचे जावई असलेल्या प्रकाश चापेकर या तरुणाशी प्रेमसंबंध जुळले होते. या तरुणीने प्रकाश चापेकर यांच्याशी लग्न करण्याचा हट्ट धरल्याने प्रकाश चापेकर यांनी आपली पत्नी प्रतिभा चापेकर, मेहुणा दत्ता सुभाष लोहार यांनी मिळून सदरील मुलीच्या खुनाचा कट रचला.

प्रकाश चापेकर याने सदरील तरुणीस फूस लावून वाघोली शिवारात घेऊन आला तसेच प्रकाश व दत्ता या दोघांनी मिळून तिचा गळा चिरून खून केला आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह पोत्यात भरून विहिरीत टाकला होता. या गुह्यात वापरलेली एमएच 12, जेझेट 4720 ही वेंटो कार ही पोलिसांनी तपासादरम्यान जप्त केली होती.

सदरील गुह्यांची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालय क्र.3 अतिरिक्त सत्र न्यायाधीश मखरे यांच्यासमोर झाली. उपलब्ध पुराव्याची सांगड व स्पष्टीकरण सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता जयंत देशमुख यांनी योग्य रितीने केले. या वरून न्यायालयाने वरील नमूद तिन्ही आरोपींना फौजदारी पात्र कट रचणे, खून करणे, पुरावा नष्ट करणे या आरोपाबद्दल दोषी ठरवून प्रकाश सूर्यकांत चापेकर (40) यास आजन्म कारावास व पाच हजार रुपयं दंड, दत्ता सुभाष लोहार (33) यास आजन्म कारावास व पाच हजार रुपयं दंड तसेच प्रतिभा प्रकाश चापेकर (31) यासही आजन्म कारावास व 1 हजार दंडाची शिक्षा सुनावली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या