
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
व्हॉट्सऍप, स्काईप कडून दिल्या जाणार्या ओव्हर द टॉप सेवा कायद्याअंतर्गत आणल्या जाव्यात की नाही यावर ट्राय विचार करत आहे. याबाबत फेब्रुवारी महिन्यात निर्णय येऊ शकतो. ट्रायचे संचालक आर.एस.शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार या कायद्यासाठी लवकरच लोकांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न ट्राय करणार आहे.
गूगल ड्युओ, फेसबुक, व्हॉट्सऍप आणि स्काईप हे ऍप इंटरनेटवर आधारित मोबाईल सारख्या कॉलिंग आणि मेसेजिंग सुविधा देत आहेत. या सुविधाही ट्रायच्च्या अंतर्गत आणून त्यांना कायदेशीर करावे असा विचार गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये समोर आला होता.
या सेवांनाही कायद्याच्या अखत्यारित आणावे अशी मागणी दूरसंचार कंपन्यांनी केली होती. दूरसंचार सेवा पुरवणार्या संघटनेने म्हटले आहे, की दूरसंचास कंपन्या, परवाना शुल्क, दूरसंचार उपकरण आणि सुरक्षा उपकरणांवर खूप खर्च करतात. तेव्हा हे ऍप कुठल्याही नियमांशिवाय कॉलिंग आणि मेसेजिंग सुविधा पुरवत आहेत. ही बाब चुकीची असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ट्रायला लिहिलेल्या पत्रात त्यांनी या सुविधा कायदेशीर कराव्यात अशी मागणी केली होती. तर दुसरीकडे इंटरनेट ऍन्ड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाने या ओटीटी सेवा कायदेशीर करण्याचा विरोध केला आहे.























































