
जनतेने लोकशाहीवर विश्वास ठेवून चिपळूण नगरपरिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पाच उमेदवारांना नगरसेवक पदाच्या निवडणुकीत विजयी केले आहे. सत्तेच्या जीवावर विरोधक उड्या मारत असताना जनतेने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षावर दाखवलेला विश्वास आम्ही वाया जाऊ देणार नाही. आमचे पाच नगरसेवक चिपळूण नगरपरिषदेत प्रखर विरोधी पक्षाचे काम करून जनतेसाठी सतत आवाज उठवतील, असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख सहदेव बेटकर यांनी व्यक्त केला. चिपळूण नगरपरिषदेतील शिवसेनेच्या नवनिर्वाचित पाच नगरसेवकांचा सहदेव बेटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
चिपळूण नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अजय भालेकर, वैशाली कदम, कांचन शिंदे, मिथिलेश उर्फ विक्की नरळकर आणि संजय गोताड विजयी झाले. या विजयी उमेदवारांचे जिल्हा संपर्कप्रमुख सहदेव बेटकर यांनी चिपळूण येथे जाऊन अभिनंदन करून सत्कार केला. त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीला शुभेच्छा देताना त्यांना जनतेसाठी सतत लढत रहा. संघर्ष करा, असा सल्ला दिला.
पुढे जिल्हा संपर्कप्रमुख सहदेव बेटकर म्हणाले की, सत्तेच्या जोरावर चिपळूण नगर परिषद निवडणूक महायुतीने जिंकली असली तरी जनतेने लोकशाहीवर विश्वास ठेवत शिवसेनेच्या पाच शिलेदारांना विजयी केले आहे. हे आमचे पाच शिलेदार चिपळूण शहरातील नागरिकांचा आवाज बनतील.सत्ताधाऱ्यांनी चुकीचे काम केले तर शिवसेनेचे पाच नगरसेवक आक्रमकपणे जनतेची बाजू मांडतील असा विश्वास सहदेव बेटकर यांनी व्यक्त केला. यावेळी चिपळूण विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम व इतर पदाधिकारी उपस्थित होते.






























































