
राज्यात महिला सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असताना खुद्द मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्ये मुलींच्या शासकीय वसतिगृहात मध्यरात्री विद्यार्थिनीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. यावेळी तरुणीने प्रतिकार करीत आरडाओरडा केल्यामुळे हा तरुण विद्यार्थिनीचा मोबाईल हिसकावून पळून गेला.
नागपूरमधील आय.सी. चौकातील या वसतिगृहात मध्यरात्री 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास दोन तरुण घुसले होते. यावेळी इंजिनीअरिंगचे शिक्षण घेणाऱया या विद्यार्थिनीवर एका तरुणाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मध्यरात्री अचानक घडलेल्या या प्रकारामुळे या तरुणीने आरडाओरडा केला. यामुळे सुदैवाने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, या प्रकरणात वसतिगृह प्रशासन आणि पोलिसांकडूनही सुरक्षेबाबत गंभीर दुर्लक्ष झाल्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप विद्यार्थिनींच्या नातेवाईकांसह सामाजिक संघटनांकडून आला आहे.
सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षकच नाही
या वसतिगृहात सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षक अथवा कोणतीही तत्काळ सुरक्षा यंत्रणा उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे ही घटना घडल्यानंतर विद्यार्थिनींनी वसतिगृह प्रशासनाकडे तक्रार करूनही प्रशासनाने पोलिसांना कळवले नाही. शिवाय सुरक्षेसाठी कोणता बंदोबस्तही केला नाही. वसतिगृह प्रशासनाकडून हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही विद्यार्थिनींनी केला आहे.
नागपुरात पोलिसांचा धाक राहिला नाही – वडेट्टीवार
नागपूरमध्ये महिला सुरक्षेचे तीनतेरा वाजल्यामुळेच या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. वसतिगृहाजवळच दारूचे दुकान आहे. मात्र वसतिगृहात कोणतीही सुरक्षा नाही. वसतिगृहाच्या दरवाजाला साधे कुलूपही नाही. अशा स्थितीत इथे मुली राहणार तरी कशा, असे ते म्हणाले.