
लॉर्डस् कसोटीत देदीप्यमान विजय साकारणाऱया हिंदुस्थानी क्रिकेट संघाला लीडस् येथील तिसऱया कसोटीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. आता 2 सप्टेंबरपासून ओव्हल येथे सुरू होणाऱया चौथ्या कसोटीत टीम इंडियात बदलाचे वारे वाहू लागले आहेत. हिंदुस्थानी संघात ओव्हल कसोटीसाठी बदल होणार हे निश्चित आहे. सूर्यपुमार यादव, हनुमा विहारी, मयांक अग्रवाल या फलंदाजांमध्ये अंतिम अकरामध्ये स्थान मिळवण्यासाठी चुरस असणार आहे. तसेच दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याचे अकरा जणांमधील स्थान पक्के आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
फलंदाजी विभागात बदल होणार?
कर्णधार विराट कोहलीने यष्टिरक्षक रिषभ पंतची पाठराखण केल्यामुळे त्याला चौथ्या कसोटीत बाहेर ठेवले जाईल असे वाटत नाही. पण अखेरच्या क्षणी त्याला बाहेर काढण्याचा निर्णय घेतल्यास लोकेश राहुलकडे यष्टिरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात येईल. अशाप्रसंगी मधल्या फळीत मयांक अग्रवाल, सूर्यकुमार यादव व हनुमा विहारी या तीन फलंदाजांमध्ये एका स्थानासाठी चुरस लागेल. या जागेसाठी कोणत्या फलंदाजाला खेळवायचे हा निर्णय खेळपट्टी बघितल्यानंतर घेतला जाईल.
इशांतला मिळणार बाहेरचा रस्ता
अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याला चौथ्या कसोटीत संघाबाहेर ठेवण्यात येईल अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे. कारण तिसऱया कसोटीत त्याच्याकडून सपशेल निराशा झाली. ओव्हल कसोटीत हिंदुस्थानचा संघ सात फलंदाज व चार गोलंदाजांसह मैदानात उतरेल असे वाटत नाही. त्यामुळे जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी व मोहम्मद सिराज या वेगवान गोलंदाजांसह रविचंद्रन अश्विन या फिरकी गोलंदाजाला संघात स्थान देण्यात येईल. पाचवा गोलंदाज म्हणून शार्दुल ठापूरच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते.
अखेर अनुभवी फिरकीपटूची एण्ट्री होणार
हिंदुस्थानी संघ व्यवस्थापन चार वेगवान गोलंदाज व एक अष्टपैलू फिरकी गोलंदाज या का@म्बिनेशनने मैदानात उतरण्याला प्राधान्य देते. अशा परिस्थितीत रविचंद्रन अश्विनला इंग्लंडविरुद्धच्या सध्या सुरू असलेल्या मालिकेत बाहेरच बसावे लागले आहे. पण ओव्हल येथील कसोटीत त्याची टीम इंडियामध्ये एण्ट्री होणार हे निश्चित आहे. रवींद्र जाडेजाला दुखापत झाली असून मागील कसोटीत त्याच्याकडून चमकदार कामगिरीही झालेली नाही. त्यामुळे आता अनुभवी रविचंद्रन अश्विन कमबॅक करील यात वाद नाही.


























































