आखातातील संघर्षाचा जबर फटका; हिंदुस्थानात आतापर्यंत १० हजाराहून अधिक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

आखातात संघर्ष सुरू झाल्यापासून विमान कंपन्यांना मोठा फटका बसला. अनेक विमाने रद्द करावी लागली तर काही बऱ्याच विमानांना गंतव्यस्थानी पोहोचवण्यासाठी मार्ग बदल करावा लागला. हिंदुस्थानात देखील विमान कंपन्यांना चांगलाच त्रास सहन करावा लागला. हिंदुस्थानच्या विमान कंपन्यांनी १०,००० हून अधिक उड्डाणे रद्द केली आहेत. वाढता तणाव आणि हवाई क्षेत्रावरील निर्बंधांमुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीत अडथळे निर्माण झाले आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिली.

महत्त्वाचे हवाई मार्ग मोठ्या प्रमाणावर बंद झाल्यामुळे विमान कंपन्यांना विशेषतः युरोप आणि उत्तर अमेरिकेच्या लांब पल्ल्याच्या मार्गावरील सेवा स्थगित करणे किंवा त्यांचे मार्ग बदलणे भाग पडले आहे.

‘सरासरी, हिंदुस्थानी विमान कंपन्या आखातात दररोज सुमारे ३०० ते ३५० उड्डाणे करत असत. आज ही संख्या ८०-९० पर्यंत खाली आली आहे. यामुळे ही परिस्थिती सुरू झाल्यापासून, म्हणजेच २८ फेब्रुवारीपासून, हिंदुस्थानी विमान कंपन्यांनी रद्द केलेल्या एकूण उड्डाणांची संख्या १०,००० च्या पुढे गेली आहे’, अशी माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे सहसचिव असंगबा चुबा आओ यांनी दिली. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार पश्चिम आशियातील घडामोडींवरील एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे.