चेंडू शोधायला गेले अन् झाडीत सापडली स्फोटकं; सरकारी शाळेजवळून जिलेटिनच्या 161 कांड्या जप्त, सुरक्षा यंत्रणा अलर्ट

राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या आत्मघाती बॉम्ब स्फोटानंतर देशभरातली सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. दहशतवाद्यांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. दिल्ली बॉम्ब स्फोटाआधी हरयाणातून तब्बल 2900 किलो स्फोटकं जप्त करण्यात आली होती. आता उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यातील डाबरा येथील सरकारी शाळेजवळ झाडीमध्ये स्फोटके सापडल्याने खळबळ उडाली आहे.

डाबरातील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी क्रिकेट खेळत असताना त्यांचा चेंडू शाळेजवळील झाडीत जातो. हा चेंडू शोधत असताना मुलांना झाडीत स्फोटके आढळतात. मुलं तत्काळ मुख्याध्यापकांना याबाबत माहिती देतात आणि मुख्याध्यापक जवळील पोलीस स्थानकामध्ये सूचित करतात.

माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल होतात आणि संपूर्ण परिसराची नाकाबंदी करतात. त्यानंतर बॉम्ब शोधक पथक, डॉग स्कॉड दाखल होते. घटनास्थळावरून 160 जिलेटिनच्या कांड्या आणि 20 किलो स्फोटक पदार्थ जप्त करण्यात येतो. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात स्फोटक पदार्थ कायदा, 1908च्या कलम 4(अ) आणि बीएनएसच्या कलम 288 गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

याबाबत अल्मोडाचे एसएसपी देवेंद्र पिंचा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, घटनास्थळावरून स्फोटकांचे नमुने गोळा करण्यात आले आहेत. फॉरेन्सिकचा अहवाल आल्यानंतर या जिलेटिनच्या कांड्या आणि स्फोटके कोणत्या उद्देशाने तिथे ठेवण्यात आल्या होत्या हे स्पष्ट होईल. साधारणता: ही सामग्री रस्तेकामात दगडं फोडण्यासाठी वापरण्यात येते. परंतु पोलीस सर्व पैलुंचा विचार करत आहे.