
देशभरातील सरकारी शाळांची अवस्था लपून राहिलेली नाही. मात्र दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे. देशभरातील पाच हजारांहून अधिक शाळा ओस पडल्या आहेत. तिथे एकही विद्यार्थी नाही, अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
संसदेत शिक्षण विभागाने सादर केलेल्या आकडेवारीवरून असे दिसून आलंय की, देशातील 10.13 लाख सरकारी शाळांपैकी 5149 शाळांमध्ये 2024-25 या वर्षी एकाही मुलाने शाळेत प्रवेश घेतलेला नाही.
सरकारी आकडेवारीनुसार या शैक्षणिक वर्षात शून्य प्रवेश असलेल्या या शाळांपैकी 70 टक्क्यांहून अधिक शाळा तेलंगणा आणि पश्चिम बंगालमधील आहेत. तर अनेक शाळांमध्ये फक्त 5 ते 10 विद्यार्थी आहेत. युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन प्लस च्या आकडेवारीनुसार, तेलंगणातील नालगोंडा जिह्यात राज्यात तसेच देशात सर्वाधिक 315 रिक्त शाळा आहेत. महबूबाबादमध्ये 167 शाळा आहेत आणि वारंगलमध्ये 135 शाळा आहेत, जे राज्यातील पुढील दोन जिल्हे आहेत.
देशभरात, 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये 1.44 लाख शिक्षक तैनात आहेत, जे 2022-23 मध्ये 1.26 लाख होते. सरकारी आकडेवारीनुसार, पश्चिम बंगालमध्ये कमी पटसंख्या असलेल्या 6,703 सरकारी शाळांमध्ये 27,348 शिक्षक नियुक्त आहेत. बिहारमध्ये अशा 730 शाळांमध्ये 3,600 शिक्षक नियुक्त केले आहेत, म्हणजेच प्रत्येक शाळेत अंदाजे पाच शिक्षक आहेत.




























































