पु.ल. कट्टा आजपासून पुन्हा सुरू , खुल्या रंगमंचावर कला सादर करण्याची संधी

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु.ल. देशपांडे यांची उद्या 12 जून रोजी 25वी पुण्यतिथी. याचे औचित्य साधून नूतनीकरण झालेल्या पु.ल. देशपांडे कला अकादमीतील खुल्या रंगमंचावरील ‘पु.ल. कट्टा’ उपक्रम पुन्हा सुरू होत आहे. यानिमित्ताने दर शुक्रवारी अकादमीच्या खुल्या रंगमंचावर राज्यभरातील सर्व कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.

पु.ल. कट्टय़ाचे उद्घाटन गुरुवारी सायंकाळी 6 ते 8 या वेळेत होईल. या वेळी गायक शार्दुल कवठेकर, गायिका अदिती पवार, हार्मोनिअम वादक प्रणव हरिदास, तबला वादक सौरभ शिर्पे, अभिवाचक अक्षय शिंपी, नेहा कुलकर्णी, डॉ. कविता सोनावणे, नृत्यांगना राधिका जैतपाळ हे तरुण कलाकार आणि ज्येष्ठ कलाकार डॉ. शिरीष ठाकूर हे सर्व आपल्या सादरीकरणातून पुलंना मानवंदना देणार आहेत. सूत्रसंचालन जान्हवी दरेकर करतील. पुलंच्या साहित्यकृतीवर आधारित या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.