जागतिक बॅडमिंटन स्पर्धा, सिंधू सुवर्णपदकापासून एक पाऊल दूर

235

हिंदुस्थानची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिसऱयांदा धडक दिली. सिंधूने उपांत्य लढतीत आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करताना चीनच्या चेन युफेई हिचा 21-07, 21-14 असा सरळ गेममध्ये धुव्वा उडवला. या स्पर्धेत दोन वेळा रौप्यपदकावर समाधान मानावे लागलेली सिंधू यावेळी पदकाचा रंग सोनेरी करणार काय याकडे तमाम देशवासीयांच्या नजरा असतील.

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सिंधूने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करीत अवघ्या 15 मिनिटांत पहिला गेम जिंकला. 8-3 अशी आघाडी घेणाऱया सिंधूने लागोपाठ गुणांची कमाई करीत 14-3 अशी मुसंडी मारली. निर्विवाद वर्चस्व गाजविलेला पहिला गेम सिंधूने 21-7 फरकाने जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधूला युफेईने सुरुवातीला झुंजवले, मात्र, सिंधूने तिला एकदाही आघाडी घेण्याची संधी दिली नाही. जाळीजवळील देखणा खेळ, काही मारलेले जबरदस्त स्मॅशेस आणि वेगवान पदलालित्याच्या जोरावर सिंधूने चिनी प्रतिस्पर्धीला नामोरहम केला.

या स्पर्धेत 2018 च्या किताबी लढतीत सिंधूला स्पेनच्या कॅरोलिन मरीनकडून हार पत्करावी लागली होती, तर 2017 च्या अंतिम लढतीत जपानच्या नोजोमी ओकुहाराने तिला नामोहरम केले होते. या स्पर्धेत सिंधूच्या खात्यामध्ये दोन रौप्य व दोन कास्य अशी एकूण चार पदके झाली आहेत.

साई प्रणीतला कास्यपदक

हिंदुस्थानला पुरुषांच्या एकेरीत 36 वर्षांनंतर कास्य पदक मिळाले. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या जपानच्या केंतो मोमोता याने उपांत्य लढतीत 19 व्या मानांकित साई प्रणीतला 21-13, 21-8 असे हरवले. ही लढत अवघ्या 42 मिनिटांत संपली. पराभूत झाल्याने साई प्रणीतला  कास्यपदकावर समाधान मानावे लागले.

आपली प्रतिक्रिया द्या