दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर; प्रा. आशालता कांबळे, शाहू पाटोळे, सुकन्या शांता आणि अरुणा सबाने यंदाचे मानकरी

साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिष्ठेचा ‘पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार’ आज जाहीर झाला असून यंदाच्या पुरस्कारांसाठी ज्येष्ठ लेखिका प्रा. आशालता कांबळे, लेखक शाहू पाटोळे, पत्रकार सुकन्या शांता यांची निवड झाली. सोबतच ‘सूर्य गिळणारी मी’ या आत्मकथनासाठी अरुणा सबाने यांना यंदाचा ग्रंथाली पुरस्कृत ‘बलुतं’ पुरस्कार जाहीर झाला. प्रत्येकी दहा हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

येत्या 20 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता दादर-माटुंगा कल्चरल सेंटर, माटुंगा पश्चिम येथे लोकशाहीर संभाजी भगत यांच्या अध्यक्षतेखाली दया पवार स्मृती पुरस्कार वितरण सोहळा पार पडेल. यावेळी गायिका-संशोधक प्राची माया गजानन यांच्या ‘आदिवासी संगीत यात्रा – सप्रयोग आख्यान’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र पोखरकर करतील.

यासंबंधी दया पवार प्रतिष्ठानचे सचिव प्रशांत पवार म्हणाले,   दया पवार स्मृती पुरस्काराचे यंदाचे 26 वे वर्ष आहे. सलग 25 वर्षे एखादी कृती सुरू ठेवणे हे आजच्या काळात सोपे नाही, मात्र प्रत्येक कार्यक्रमाला वाढत जाणारे जुन्या पिढीतले आणि नव्याने जोडले जाणारे दया पवारांचे तरुण चाहते, या एकमेव गोष्टीमुळे दया पवार प्रतिष्ठानला हा कार्यक्रम करण्यासाठी नवीन ऊर्जा मिळत असते.