जागतिक वारसा स्थळांमध्ये ‘पद्मदुर्ग’चा समावेश नाही, शिवप्रेमींची नाराजी

मुरुड समुद्रकिनाऱ्यापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या पद्मदुर्ग किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळात समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी खोल अरबी समुद्रात पद्मदुर्ग किल्ला बांधला होता.

पद्मदुर्ग किल्ल्यासंदर्भात नेहमीच दुजाभाव केला जातो. या किल्ल्याकरिता एक रुपयाचाही निधी मिळत नाही. त्यामुळे किल्ल्याचे जतन व संवर्धन होत नाही. किल्ल्याच्या भिंती समुद्राच्या लाटांनी कमकुवत होऊन पडीक झाल्या आहेत, पण या किल्ल्याकडे लोकप्रतिनिधींना लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. पद्मदुर्गचे नाव जागतिक वारसा स्थळाच्या यादीत नाव आले असते तर किल्ल्याच्या विकासासाठी मोठा निधी मिळाला असता. मात्र दुर्दैवाने तसे झाले नाही, अशी खंत पद्मदुर्ग जागर व गड भ्रमण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आशिलकुमार ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.

पर्यटकांचा ओघ वाढला असता

पद्मदुर्ग किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश झाला असता तर या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढला असता. त्यामुळे पर्यटन व्यवसायाला चालना मिळाली असती. इतिहास अभ्यासकांमुळे पद्मदुर्ग किल्ल्याचा इतिहास जगभर प्रसिद्ध झाला असता. मात्र या किल्ल्याचा समावेश जागतिक वारसा स्थळाच्या यादीत झाला नाही, अशी नाराजी शिवप्रेमींनी व्यक्त केली आहे.