पहलगाम हल्ल्यामुळे जम्मू-कश्मीरमधील लोक सर्वाधिक त्रस्त – फारुख अब्दुल्ला

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. यातच जम्मू कश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे (जेकेएनसी) प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर भाष्य करताना म्हटलं आहे की, “पहलगाममधील घटना खूप वेदनादायक आहे. या हल्ल्यामुळे जम्मू आणि कश्मीरमधील लोक सर्वाधिक त्रस्त आहेत.”

पहलगाम हल्ल्याबाबत फारुख अब्दुल्ला म्हणाले की, “हा हल्ला सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणेतील त्रुटींमुळे घडला यात काहीच शंका नाही. येथे आपण आपले जीवन खूप चांगल्या प्रकारे जगत आहोत, हे पाकिस्तानला आवडत नाही. आमच्या लोकांमध्येही चुकीची माहिती पसरवली गेली. म्हणूनच पाकिस्तानने हा हल्ला केला. परंतु याचा हिंदुस्थानातील मुस्लिमांवर काय परिणाम होणार आहे, याकडे त्यांनी लक्ष दिले नाही.”