Pahalgam Terror Attack : पाकिस्तानातून येणाऱ्या पोस्ट व पार्सल सेवेवर बंदी

पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानविरोधात कडक पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानसोबत आयातीवर बंदी घातल्यानंतर आता हिंदुस्थानने पाकिस्तानातून येणाऱ्या पोस्ट व पार्सल सेवेवर बंदी घातली आहे. पोस्ट विभागाने एक पत्रक प्रसिद्ध करत ही माहिती दिली आहे. याचा परिणाम दोन्ही देशांमध्ये हवाई आणि जल मार्गाने होणाऱ्या आदान प्रदानावर होणार आहे.

या स्थगितीचा परिणाम आता दोन्ही देशातील पत्रव्यवहार, व्यावसायिक पार्सल आणि खासगी पत्रव्यवहारांवर होणार आहे. दोन्ही देशांतील आयात निर्यातीवर बंदी घातल्यानंतर काही तासात हा निर्णय देखील घेण्यात आला. 2019 ला पुलवामा हल्ल्यानंतरही पोस्ट सेवा बंद करण्यात आली होती. मात्र तीन महिन्यानंतर ही सेवा पुन्हा सुरू करण्यात आली.

आयात बंदी

हिंदुस्थानने पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व वस्तूंच्या आयातीवर बंदी झाली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने शनिवारी याबाबत निर्णय घेतला असून पाकिस्तानसोबतचे सर्व आर्थिक संबंध पूर्णपणे तोडण्याच्या दिशेने केंद्र सरकारकडून पावले टाकली जात असल्याचे हे द्योतक आहे. पुढील आदेश येईपर्यंत पाकिस्तानकडून कोणतीही वस्तू हिंदुस्थानमध्ये येणार नाही. राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरणाच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने शनिवारी एक पत्रक जारी करत स्पष्ट केले. ही बंदी तत्काळ लागू होणार आहे.