पैठण – जायकवाडी धरणाचे सर्व दरवाजे उघडले, महापूराची भीती

जायकवाडी धरणाच्या 9 आपात्कालीन दरवाजांसह आज पुन्हा सर्व 27 दरवाजे ऊघडून एकुण 80 हजार 172 क्युसेक्स प्रतिसेकंद याप्रमाणे जलविसर्ग केला जात आहे. त्यामुळे गोदावरी नदिचा जलफुगवटा वाढला असुन पैठणपासुन ते नांदेडपर्यंत महापुराची स्थिती निर्माण झाली आहे.

जायकवाडी धरणामधून आज दि. 26 रोजी विसर्ग वाढवण्यात आला. दुपारी 11 ते 11.30 या दरम्यान प्रथम जलविसर्ग वाढवण्यात आला. नंतर दुपारी 2 वाजता क्रमांक 1, 9, 5, 3, 7, 2, 8, 4 व 6 हे आपात्कालीन 9 दरवाजे टप्याटप्याने प्रत्येकी 2 फुट ऊघडून अतिरीक्त 14 हजार 148 क्युसेक्स एवढे पाणी सोडण्यास सुरुवात केली. अशी माहिती जलसंपदा विभागाचे जायकवाडी येथील कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी दिली. दरम्यान 10, 27, 18, 19, 16, 21, 14, 23, 12, 25, 11, 26, 13, 24, 15, 22, 17 व 20 क्रमाकांचे 18 दरवाजे प्रत्येकी 4 फुट वर करण्यात आले. यातून 80 हजार 172 क्युसेक्स असा एकुण 94 हजार 320 क्युसेक्स एवढा मोठा जलप्रवाह प्रतिसेकंदाला गोदावरीच्या नदीपात्रात झेपावतो आहे. अशी माहिती जलसंपदा विभागाच्या जायकवाडी (ऊत्तर) येथील दगडी धरण ऊपविभागाचे सहाय्यक अभियंता बुध्दभुषण दाभाडे यांनी दिली.

jayakwadi-dam

या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या तालुक्यातील 14 गावांसह थेट नांदेड पर्यंत पुरस्थीती निर्माण झाली आहे. त्यातच नदिकाठावरील गावांमध्ये मुसळधार पाऊसही पडतो आहे. अशा आपात्कालीन परिस्थितीत पैठण शहरासह नदिकाठावरील ग्रामस्थांनी सतर्क राहावे. सावधगिरी बाळगावी. नदीच्या पात्रात अथवा जवळपास जनावरे बांधू नये. फुगवट्यापासून सुरक्षित अंतरावर राहावे. नदीत जाऊ नये. कोणतेही संकट आल्यास पैठणच्या तहसील कार्यालयात संपर्क साधावा. असे आवाहन तहसीलदार चंद्रकांत शेळके व नगर परिषद मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी दै.सामना शी बोलताना केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या