
पाकिस्तानबरोबर कोणत्याही मुद्द्यावर बोलायला हिंदुस्थान तयार आहे. मात्र, दहशतवादावर बोलणार नाही. कारण कश्मीर बळकवण्यासाठीच पाकिस्तानने गेल्या 72 वर्षांत दहशतवादाचा उद्योग उभारला आहे. पाकिस्तान म्हणजेच टेररिस्तान आहे, अशा स्पष्ट शब्दांत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला खडसावले. न्यूयॉर्कमधील सांस्कृतिक कार्यक्रमात जयशंकर बोलत होते. ते म्हणाले, ‘कश्मीरमधून 370 कलम हटवल्यामुळे पाकिस्तानच्या दहशतवाद पोसण्याच्या उद्योगाला मोठा झटका बसला आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि चीन या विरोधात हिंदुस्थानविरोधात डंका पिटत आहेत. पण आम्ही आमच्याकडे असलेल्या कश्मीरबाबतच ही निर्णय घेतला आहे. तो आमचा अधिकारही आहे. पाकिस्तानने मात्र कश्मीर आणि हिंदुस्थानविरोधासाठीच दहशतवादाचा उद्योग सुरू केला. कश्मीरमधून 370 कलम हटवून हिंदुस्थानने या दहशतवादी उद्योगाला पायापासून तोडले आहे. त्यामुळे राग आणि वैफल्यग्रस्त झालेला पाकिस्तान हिंदुस्थानवर मनाला येईल ते आरोप करत सुटला आहे.’

























































