आर्थिक निर्बंधांच्या भीतीने पाकिस्तानची नौटंकी, ‘तोयबा’,‘जमात-उद-दवा’च्या दहशतवाद्यांना अटक

532

दहशतवादी संघटनांची आर्थिक रसद तोडण्यास, दहशतवादाला आळा घालण्यास पावले न उचलणाऱया पाकिस्तानने आज ‘एफएटीएफ’च्या आर्थिक निर्बंधांच्या भीतीने ‘लष्कर-ए-तोयबा’ आणि ‘जमात-उद-दवा’च्या चार दहशतवाद्यांना अटक केली, मात्र पाकिस्तानची ही नौटंकी नेहमीप्रमाणे जगाच्या डोळय़ांत धूळफेक करणारी आहे.

दहशतवादी संघटना आणि त्यांच्या म्होरक्यांना आर्थिक मदत करणाऱ्या देशांवर निर्बंध लादणारी आंतरराष्ट्रीय संघटना ‘फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स’ची (एफएटीएफ) बैठक पॅरिसमध्ये 12 ते 15 ऑक्टोबरला होणार आहे. या बैठकीत आधीच ग्रे यादीत असलेल्या पाकिस्तानला काळय़ा यादीत टाकण्याची कारवाई होऊ शकते. याची कुणकुण लागताच पाकिस्तानच्या दहहशतवादविरोधी पथकाने कारवाईचे नाटक करत ‘तोयबा’ आणि ‘जमात’च्या चार दहशतवाद्यांना अटक केली.

पाकिस्तानला काळय़ा यादीत टाकले तर…
पाकिस्तान आधीच महागाई, बेकारी त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, चीन आणि सौदी अरेबियाच्या कर्जाच्या विळख्यात अडकलेला आहे. अशा वेळी पाकिस्तानला ‘एफएटीएफ’ने ग्रे यादीतून काळय़ा यादीत टाकले तर त्याला जगातील कोणताही देश आर्थिक मदत करू शकणार नाही किंवा कर्ज देऊ शकणार नाही. असे झाले तर पाकिस्तानमध्ये गृहयुद्ध होण्याचा धोका आहे. ‘एफएटीएफ’ने या आधी इराण आणि उत्तर कोरियाला काळय़ा यादीत टाकले आहे.

कर्तारपूर कॉरिडॉरबाबत पाकडय़ांची पलटी
हिंदुस्थानातील शीख बांधव बहुप्रतीक्षित कर्तारपूर कॉरिडॉर केव्हा खुला होतोय याची वाट बघत असताना पाकिस्तानने गुरुवारी पलटी खाल्ली. महिनाभरापूर्वी या कॉरिडॉरच्या उद्घाटनाला 9 नोव्हेंबरचा मुहूर्त जाहीर केला होता, परंतु आता असा कोणताही मुहूर्त अजून ठरलेला नाही असे विधान पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयातील प्रवक्ते मोहम्मद फैसल यांनी प्रसारमाध्यमांपुढे केले.

शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक यांच्या 550 व्या जयंती कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानातील शीख बांधवांना कॉरिडॉरच्या उद्घाटनाची प्रतीक्षा आहे. गुरुनानक जयंती लक्षात घेऊनच कॉरिडॉर वेळेत खुला केला जाईल असे आश्वासन कॉरिडॉर प्रकल्पातील वरिष्ठ अधिकाऱयांनी महिनाभरापूर्वी दिले होते. गुरुवारी परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैसल यांनी अजून उद्घाटनाचा मुहूर्त ठरायचाय असे सांगतानाच 12 नोव्हेंबरला कॉरिडॉर खुला होऊ शकतो असे स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या