इस्लामी संघटनेच्या परिषदेत सुषमा स्वराज विशेष अतिथी, पाकिस्तानचा बहिष्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

इस्लामी सहकार संघटनेच्या परिषदेत हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रण देण्यात आले आहे. ही बाब पाकिस्तानला चांगलीच झोंबली असून त्यांनी या परिषदेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.

अबुधाबीमध्ये इस्लामिक सहकारी संघटनेच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत हिंदुस्थानचा परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रण देण्यात आले आहे. यावर पाकिस्तानचे विदेश मंत्री महमूद कुरेशी यांनी नाराजी दर्शवली असून स्वराज यांच्या उपस्थितीमुळे आपण या परिषदेला जाणार नसल्याचे जाहीर केले आहे.

पाकिस्तानी वृत्तवाहिनीशी बोलताना कुरेशी म्हणाले की, “मी संयुक्त अरब अमिरतीच्या परराष्ट्र मंत्र्यांशी बोललो आहे आणि सुषमा स्वराज यांना आमंत्रित केल्याप्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे. आपण आपली भूमिका स्पष्ट केली असून हिंदुस्थानने पाकिस्तानबाबत आक्रमकती धोरण स्विकारले आहे.” म्हणून सध्या जिथे हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्री असतील तिथे आपण येणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पुलावामा हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त केले होते. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभुमीवर हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्र्यांना विशेष अतिथीचे मिळालेले निमंत्रण पाकिस्तानला पचलेले नाहिये आणि परिणामी त्यांनी या परिषदेवरच बहिष्कार टाकला आहे.