दिलीप कुमार, राज कपूर यांच्या वडिलोपार्जित घरांचे होणार म्युझियम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार दिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या पाकिस्तानातील वडिलोपार्जित हवेलीचे आता म्युझियममध्ये रुपांतर होण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. या दोन्ही हवेल्या खैबर-पख्तूनख्वाच्या प्रांत सरकारने खरेदी करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी खैबर-पख्तूनख्वाच्या प्रांत सरकारच्या पुरातत्व विभागाने तब्बल 2.30 कोटी रुपये पेशावरच्या उपायुक्तांकडे दिले आहेत.

दिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या वडिलोपार्जित हवेल्यांना राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित करण्यात आले आहे. या हवेल्यांची अवस्था चांगली नाही. त्यामुळे या हवेल्यांचे जतन व्हावे, अशी मागणी चाहत्यांकडून करण्यात येत होती. त्यानंतर आता या हवेल्यांना संरक्षण देण्यासाठी पाकिस्तान सरकार पुढे सरसावले आहे. या घरांमध्ये म्युझियम उभे करण्याचे पाकिस्तान सरकारने ठरवले आहे. त्यानुसार पेशावरचे उपायुक्त खालीद मेहमूद यांनी 7 मे रोजी सध्याच्या घरमालकांना नोटीस बजावत 18 मेपर्यंत सरकारने निश्चित केलेल्या किमतीवर आधारित रिझर्वेशन जमा करण्यास सांगितले होते.